नाशिक – महायुतीच्या उमेदवारांसाठी रविवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत प्रारंभी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. परंतु, फडणवीस यांचे भाषण सुरू झाल्यानंतर थोड्या वेळातच महिलांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याने फडणवीस यांच्यावर भाषण आटोपते घेण्याची वेळ आली.

सभेची वेळ दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात आली होती. परंतु, नियोजित वेळेपेक्षा सभा दोन तासांहून अधिक काळ उशीराने सुरू झाली. दुपारची सभा सायंकाळी सुरु झाली. सभेच्या सुरूवातीला मैदानावरील बहुसंख्य खुर्च्या रिकाम्या होत्या. मुख्य वक्त्यांची भाषणे सुरू झाल्यानंतर मैदानात गर्दी झाली. उमेदवारांच्या भाषणानंतर फडणवीस यांनी संवाद साधण्यास सुरूवात केली. फडणवीस यांनी सुरूवातीलाच नाशिकचा विकास, आगामी कुंभमेळा यासह शहरात येणाऱ्या विकास प्रकल्पांची माहिती दिली. यानंतर महिलांशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देण्यास सुरूवात केली असता महिलांनी काढता पाय घेण्यास सुरूवात केली.अवघ्या काही मिनिटात मैदानातील काही कोपरे रिकामे झाल्याने फडणवीस यांनीही सभा आटोपती घेतली. सभेनंतर या रिकाम्या खुर्च्यांची चर्चा रंगली.