नाशिक – कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावरचा चैत्रोत्सव हा भाविकांसाठी पर्वणी असतो. चैत्रोत्सवात गडावर होणारी भाविकांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सोमवारपासून ई- बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिक विभागात काही दिवसांपासून ई- बससेवा सुरू आहे. सध्या नाशिकहून पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मार्गावर ई बससेवा सुरू आहे. आता गडावर होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी नाशिक- सप्तश्रृंग गड मार्गावर ई-बससेवा सोमवारपासून सकाळी पाच ते सायंकाळी साडेसहा या वेळेत सुरू राहणार आहेत. सद्यस्थितीत नाशिक येथील मध्यवर्ती बस स्थानकातून प्रायोगिक तत्वावर सहा फेऱ्या सुरू होणार आहेत. या बससाठी पाच ते १० वर्ष वयाच्या मुलांसाठी निम्म्या तिकीटाची सवलत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि त्यांचे साथीदार, अर्जुन-द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पुरस्कार्थी आदींना सवलतीच्या दराने प्रवास करता येईल. प्रवाश्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे