कंत्राट गैरव्यवहारप्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि आयकर विभागाकडून मंगळवारी संयुक्तपणे अशोका बिल्डकॉनच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. नाशिकमधील अशोका मार्गावर अशोका बिल्डकॉनचे मुख्यालय आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ईडी, एसीबी आणि आयकर विभागाचे संयुक्त पथक या मुख्यालयात दाखल झाले. यानंतर या पथकाकडून कार्यालयात कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या चौकशीतील कोणत्याही गोष्टी अजूनपर्यंत उघड करण्यात आलेल्या नाहीत.
नाशिकमधील भुजबळ फार्म परिसरात अलिशान महालाच्या उभारणीसाठी अशोका बिल्डकॉनकडून पैसा पुरविण्यात आल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु, हे आरोप तथ्यहीन असल्याचे नमूद करत अशोका बिल्डकॉनने भुजबळ कुटुंबियांना बंगल्यासाठी कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याचे म्हटले होते.
याशिवाय, पिंपळगाव रस्त्यावरील अशोका बिल्डकॉनच्या टोलनाक्यावरही छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सांभाळत असताना भुजबळांनी अशोका बिल्डकॉन कंपनीला नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासह राज्यातील अनेक रस्त्यांची कामे मिळवून दिली होती. त्या मोबदल्यात या ठेकेदाराने भुजबळ फाऊंडेशनला कोटय़वधी रुपये दिले. त्यातील ४० कोटींच्या बँक खात्यातील दस्तावेज मिळाले असून भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांवर भुजबळ महालाचे बांधकाम झाल्याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले होते. याशिवाय, अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया आणि आशिष कटारिया यांनी भुजबळ कुटुंबियांना ‘फिफा’चे फुटबॉल सामने दाखविण्यासाठी खास विमानाने परदेशात नेले, असा आरोप करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा