लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव : काही दिवसांपासून येथे गाजत असलेल्या जन्म दाखले घोटाळा प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) प्रवेश झाला आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने ईडीच्या पथकाने शुक्रवारी येथे नऊ ठिकाणी छापे टाकले.

विलंबाने जन्मदाखले प्राप्त करण्याच्या प्रक्रियेद्वारे मालेगावात बांगलादेशींनी मोठ्या प्रमाणावर बनावट जन्मदाखले प्राप्त केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार येथील छावणी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत पोलिसांनी आरोप ठेवलेल्या संशयितांची संख्या ४० वर गेली आहे. त्यात संबंधित अर्जदार, दलाल, वकील, महापालिका आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील बहुसंख्य संशयित कारागृहात आहेत. काही संशयितांना अटकपूर्व जामीन मिळाला असून काही जण फरार आहेत. या प्रकरणी राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपासणी पथकाद्वारे देखील (एसआयटी) तपास सुरू आहे. तसेच महसूल प्रशासनाने वर्षभराच्या कालावधीत दिलेले सुमारे चार हजार जन्म दाखले अवैध ठरवून ते रद्द करण्याची कारवाई केली आहे.

ईडीच्या पथकाने शहराच्या रौनकाबाद भागातील अब्दुल शेख आणि गजाला परवीन या दोघांच्या घरांसह अन्य सात ठिकाणी छापे टाकून झडती घेतली. शेख आणि परवीन हे दोघे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कर्मचारी आहेत. दोघे सध्या कारागृहात आहेत. राज्य राखीव दलाच्या जवानांसह स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात हे छापे टाकण्यात आले.

दरम्यान, बांगलादेशी घुसखोरांनी मालेगावातून बनावट जन्म दाखले प्राप्त केल्याचे एकही प्रकरण अद्याप तपासी यंत्रणांना आढळून आले नाही, असा दावा करत भाजपच्या मंडळींनी मालेगावची केवळ बदनामी चालवली असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. या मंडळींनी स्वतःचे अपयश झाकण्यासाठी ईडीच्या रुपाने आणखी एक यंत्रणा या कामात जुंपली असल्याचेही शेख यांनी म्हटले आहे.