दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाची योजना
नाशिक : विद्यार्थी आणि पालकांच्या भावविश्वात चलबिचल निर्माण करणाऱ्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांवर या परीक्षांचा असणारा ताण पाहता नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’साठी अभिनव पाऊल उचलले आहे. समुपदेशकांसह लोकप्रतिनिधी, यशस्वी विद्यार्थ्यांची मदत घेत, चित्रफिती प्रबोधनांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांचा ताण हलका करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
बऱ्याचवेळा १० वी आणि १२ वीच्या परीक्षा या पालकांकडून तसेच समाजातील काही घटकांकडून विद्यार्थ्यांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारखी स्थिती निर्माण केली जाते. पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे मानगुटीवर घेत विद्यार्थी ‘कॉपी’ किंवा ‘आत्महत्या’ असे टोकाचे पाऊल उचलण्यास कचरत नाहीत. पहिल्या पर्यायात पालकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळालेला विद्यार्थी सेट-नेट, स्पर्धा परीक्षांमध्ये पहिल्याच पायरीवर अडखळतो, तर दुसऱ्या पर्यायामुळे विषय तिथेच थांबतो. एकटय़ा नाशिक विभागातून ३१२ विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला होता. यामध्ये १० वीत ८८, तर १२ वीत २२४ विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला. बारावीच्या २०० विद्यार्थ्यांनी नकल केली तर २४ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून स्वतची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती टाळण्यासाठी नाशिक शिक्षण विभागाने अनोखी योजना तयार केली आहे. यासाठी २० समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण तज्ञ, समुपदेशक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांची एकत्रित बैठक घेत विद्यार्थी नक्कल का करतात, या कारणांवर चर्चा करण्यात आली.
यंदा शाळा तसेच महाविद्यालयांकडून देण्यात येणारे २० गुण बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे कृतिपत्रिका आधारीत परीक्षा असल्याने विद्यार्थी नक्कल जास्त करतील, अशी भीती मुख्याध्यापक आणि प्राध्यापकांनी व्यक्त केली. ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी मुलांना नक्कल करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ‘ताण तणावमुक्त परीक्षा’ आणि ‘कॉपी मुक्त’ या संकल्पनेवर काम सुरू केले आहे. राज्यात नाशिक विभागाने याविषयी पुढाकार घेतल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळ सचिव नितीन उपासनी यांनी दिली.
सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ सुरू आहे. वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करीत यामध्ये लोकप्रतिनिधी, शिक्षण तज्ञ, शाळा-महाविद्यालयांचे यशस्वी माजी विद्यार्थी यांना सोबत घेत पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. मुलांवर परीक्षांचा ताण येऊ नये यासाठी पालकांनी काय करावे, परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसे पहावे, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आत्महत्या किंवा नकल हा पर्याय निवडू नये, या दृष्टीने पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी आग्रह धरण्यात येत आहे. यामध्ये माजी विद्यार्थी परीक्षेबद्दल स्वतचे अनुभव, अपयश आलेच तर यातून कसे बाहेर पडलो याविषयी माहिती देत आहे. तसेच पालकांनीही तुलना करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन या माध्यमातून होत आहे. आतापासूनच समुपदेशकांच्या माध्यमातून २४ बाय सात धर्तीवर मदतवाहिनी सुरू करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मदत होईल अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे.