नाशिक : सर्वांना शिक्षण हक्क कायदा अंतर्गत कोणी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत असल्यास पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडे इ -मेलव्दारे संपर्क करावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक आहे.

सोडत काढून प्रवेशपात्र लाभार्थी व प्रतिक्षाधीन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित करण्यात येते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही. अशा स्थितीत जर कोणी पालकांना प्रवेशाचे प्रलोभन दाखवत असेल तर पालकांनी प्रलोभनांना बळी पडू नये.

असा काही प्रकार घडल्यास जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक, प्रशासन अधिकारी महानगर पालिका, नगरपालिका, संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडे इ-मेलच्या माध्यमातून आपली तक्रार पुराव्यासह नोंदवावी, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader