नाशिक – राज्यातील काही आदिवासीबहुल भागात कोलामी, माडिया, गोंडी, वारली यासारख्या भाषांचा वापर दैनदिन व्यवहारात केला जातो. तर या भागातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शैक्षणिक भाषेचा विरोधाभास तसेच मातृभाषेतील बालवाचन पुस्तकांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक बोलीभाषांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळणार आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयच्या निर्देशानुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या मराठी बालभारती क्रमिक पाठ्यपुस्तकांचे महाराष्ट्रातील कोरकु, गोंडी, भिल माथवाडी, मावची, माडिया, कोलामी, भिल बसावे, भिल-भिलावू, वारली, कोकणा, कोकणी, पावरी व कातकरी या १२ बोलीभाषेत अनुवाद करण्यात येत आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात ‘टीआरटीआय’ने त्यांच्याकडे असलेल्या बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांचे भाषांतर करून शासकीय आश्रमशाळासाठी उपलब्ध केले. त्यामाध्यमातून आदिवासीबहुल भागातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी व शिक्षकांना बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे नेले जाणार आहे.
हे ही वाचा… आधी मोटारसायकलींची चोरी, नंतर दोघांंमध्ये वाटणी चोरांचा अनोखा समन्वय
दरम्यान, पहिल्या टप्प्यात पहिली व दुसरीचे अनुक्रमे ८६८२ आणि ८७६२ अशी एकूण १७ हजार ४४४ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली. या पुस्तकांचे वितरण आश्रमशाळास्तरावर सुरु आहे. उर्वरित पाठ्यपुस्तके लवकरच प्राप्त होणार असून, त्यानंतर त्यांचेही आश्रमशाळास्तरावर वितरण केले जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातीला आदिवासीबहुल जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण स्थानिक बोलीभाषेत देण्याचा मानस आहे. जेणेकरून प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृंद्धिगत होणे सुलभ होईल. बोलीभाषा ते प्रमाणभाषा असा विद्यार्थ्यांचा अध्ययन प्रवास असेल. त्यासाठी क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न आहे.-नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)
हे ही वाचा… नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस
बोलीभाषानिहाय अनुवादित पाठ्यपुस्तकांची संख्या
कोरकु- १६४३, गोंडी- २६५३, भिल माथवाडी- ३४०६, मावची- १५७६, माडिया- १३२०, कोलामी- २१०, भिल बसावे- १५९६, भिल-भिलावू- २२०९, वारली- ८२४४, कोकणा/ कोकणी- ६९८९, पावरी- ६४९३, कातकरी- १०४६, याप्रमाणे बोलीभाषानिहाय अनुवादित पाठ्यपुस्तकांची संख्या आहे.