मालेगाव : शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना अचानक भेटी देऊन तेथील विद्यार्थी व शिक्षकांची ‘शाळा’ घेतली. या भेटीत भुसे यांनी शैक्षणिक गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आरोग्यविषयक बाबींचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुसे हे रविवारी पहिल्यांदाच मालेगावात दाखल झाले. त्यानंतर सोमवारपासून त्यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने भुसे यांनी काही शाळांना अचानक भेटी दिल्या. साक्षात शिक्षणमंत्री शाळेत दाखल झाल्याने विद्यार्थी व शिक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. देवारपाडे येथील शाळेत विद्यार्थ्यांसमवेत बाकावर बसून विद्यार्थी व शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शैक्षणिक गुणवत्ता तपासण्याच्या उद्देशाने वाचनाचे पाठ घेत विद्यार्थ्यांकडून त्यांनी कविताही म्हणवून घेतल्या. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली का, हाता-पायांची नखे कापली का, कपडे स्वच्छ आहेत का याची खातरजमा त्यांनी केली. शाळेतील पटसंख्या आणि प्रत्यक्षात शाळेत हजर असणारे विद्यार्थी संख्या याची पडताळणी देखील शिक्षण मंत्र्यांनी केली. या पडताळणीत हजर विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे आढळून आल्याने शिक्षकांकडून त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
हेही वाचा – धुळ्यातून चार घुसखोर बांगलादेशी ताब्यात
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा मानस असून त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरुन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी या दौऱ्यात सांगितले. आजकाल आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्याचा पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. परंतु येत्या काळात ही परिस्थिती बदलेल आणि शैक्षणिक दर्जा उंचावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमातील शाळांच्या तुलनेत नक्की वाढलेला दिसेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.