नाशिक : आरोग्य विभाग तसेच प्रशासकिय पातळीवर विद्यार्थी, शिक्षक तंबाखुमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणुन आत्ता पर्यंत जिल्हातील नऊ तालुके तंबाखुमुक्त झाले. नुकताच येवला येथील एस. एन. डी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात तंबाखूमुक्त शाळा अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात येवला हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून अधिकृतरित्या घोषित करण्यात आला.
ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हेच्या पाहणीनुसार भारतात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे दर दिवसाला ३५०० लोकांचा मृत्यू होतो, तसेच वर्षाला जवळपास १३ लाख लोकांचा मृत्यू होतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने २० फेब्रुवारी २०२३ रोजी आणि त्याआधीही परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येवला तालुक्यातील एकूण ३१५ शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषित झाल्या आहेत.
हेही वाचा…जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांचा महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला
कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शाळांचा आणि केंद्रप्रमुखांचा सन्मान आरोग्य विभागाच्या जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व सलाम मुंबई फाउंडेशन तथा एव्हरेस्ट फाउंडेशनद्वारे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, मनीषा वाकचौरे तसेच सलाम मुंबई फाउंडेशनचे गणेश कातकाडे आदी उपस्थित होते. येवला हा नाशिक क्षेत्रातील १० वा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका झाला आहे, याआधी नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, चांदवड, कळवण, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, देवळा आणि सिन्नर हे तंबाखूमुक्त शाळांचे तालुके झाले आहेत.