मनमाड : शहरासाठी वाघदर्डी धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून १८ किंवा १९ व्या दिवशी पाणी वितरण होणार आहे. नागरीकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय न करता अत्यंत काटकसरीने वापर करावा, पाणी भरल्यानंतर पाण्याचे नळ बंद करावे, शक्यतो पिण्यासाठी पाण्याचा साठा करावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल यांनी केले आहे.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्या वाघदर्डी धरणात सद्यस्थितीत अत्यल्प पाणी साठा शिल्लक असून वाघदर्डी जलशुध्दीकरण केंद्रात गुरुत्वाकर्षणाने १०० टक्के क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात नैसर्गिकरित्या १५ ते १७ दिवसांवर होत असलेला पाणीसाठा १९ ते २१ दिवसांवर गेलेला आहे. याबाबत आमदार सुहास कांदे यांनी पाणी पुरवठ्याविषयी बैठक घेतली. पाणी टंचाईच्या निवारणार्थ उपाय योजना संदर्भात चर्चा करून शहराचा पाणी पुरवठा हा अल्पावधीत कसा होईल, याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनातर्फे पाणी पुरवठा विभागाची वितरणाबाबत आढावा बैठक झाली.
हेही वाचा >>> नाशिक: अवैद्य व्यवसाय प्रतिबंध पथकावर सहा संशयितांचा हल्ला
या बैठकीत धरणातील उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून पालखेड धरणातून आरक्षित बिगर सिंचनाचे पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणे अपेक्षित आहे. टंचाई ही संपूर्ण राज्यात जाणवत असून मनमाड शहरासाठी वाघदर्डी धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून १८ ते १९ व्या दिवशी शहरात पाणी वितरण होणार आहे. पालखेड धरणातून आवर्तनाचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात येईल, नागरीकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून भविष्यात निर्माण होणार्या टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाय योजनांना नागरीकांनी सहकार्य करावे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सचिनकुमार पटेल आणि पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.