नाशिक: सर्वत्र जातीभेद, धर्मभेदामुळे सामाजिक वातावरण दुषित होत असताना आजही एकमेकांच्या धार्मिक अधिष्ठानाप्रती आस्था बाळगणारे अनेक जण आढळून येतात. अशा ठिकाणांपैकी एक असलेल्या जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील मुस्लिम समाजाने अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्या दिवशी ईद- ए- मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन सामाजिक आणि धार्मिक सोहार्द दाखविले आहे.
पिंपळगावमध्ये दोन्ही समुदायातील नागरिक परस्परांच्या धार्मिक श्रध्देचा आदर करत आले आहेत. ही या गावाची ओळख झाली आहे. यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे सण २८ सप्टेंबर या एकाच दिवशी येत असल्याने मुस्लिम समाजाने ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला. गावातील तीनही मस्जिद समितीच्या प्रमुखांनी समाजाची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार यांना त्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
हेही वाचा >>> शासकीय सेवेत कंत्राटी भरतीविरोधात धुळ्यात रायुकाँचे आंदोलन
काही स्वार्थी लोक केवळ स्वार्थ साधण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करत असतात. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे अनेक जण असतात. परंतु, या सर्व गोष्टींचा पिंपळगाव येथील नागरिकांवर कोणताही परिणाम होत नाही. अशा गोष्टींना हे गाव थारा देत नाही. येथील लोक एकमेकांसोबत एकमेकांच्या धर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने राहतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरतात. शहरात विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह असतो. हे लक्षात घेऊन पिंपळगाव बसवंत शहरातील मुस्लिम समुदायाने ईद ए मिलाद मिरवणूक एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.