जळगाव : छत्तीसगडकडून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावकडे निघालेल्या मालमोटारीच्या कॅबिनखाली तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याची घटना सोमवारी पाचोरा शहरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक सर्पमित्र शैलेश पाटील यांच्या सहकार्याने नंतर त्या अजगराला पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्याने चालकासह इतरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जळगावहून चाळीसगावकडे जात असताना, मालमोटारीचा चालक पाचोरा शहरात चहा पिण्यासाठी थांबला होता. आपल्या मालमोटारीबरोबर एक अजगरही प्रवास करत असल्याचे चालकाच्या ध्यानीमनीही नव्हते. दरम्यान, रस्त्याने ये-जा करणाऱ्या काहींना मालमोटारीच्या कॅबिनखाली काहीतरी हालचाल सुरू असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यापैकी अनेकांची भंबेरी उडाली. कारण, कॅबिनखाली दुसरे तिसरे काही नाही तर एक भला मोठा अजगर लपून बसलेला होता. त्याची माहिती लगेच मालमोटारीच्या चालकाला देण्यात आली. समोरचे दृश्य पाहुन चालकाची अवस्था काय बोलावे आणि काय नाही, अशीच झाली.

एक अजगर आपल्या मालमोटारीबरोबर इथपर्यंत आल्याचे पाहताच त्याला घाम फुटला.स्थानिक सर्पमित्र शैलेश पाटील यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी मोठ्या शिताफीने अजगराला कॅबिनच्या खालून बाहेर काढले. पाणी पाजून नंतर जंगलात सोडून दिले. कॅबिनखाली अजगर कसा आणि केव्हा आला, त्याने नेमका किती किलोमीटरचा प्रवास कॅबिनखाली लपून आपल्याबरोबर केला, त्याची माहिती नसलेला मालमोटारीचा चालक कमालीचा घाबरला होता. मात्र, सर्पमित्राने इतरांच्या मदतीने अजगर सहजपणे बाहेर काढल्यानंतर चालकाने सुटकेचा निःश्वास सोडत सर्वांचे आभार मानले. त्यानंतर बिनधास्त होऊन पुढचा प्रवास सुरू केला. दरम्यान, घडल्या प्रकाराची चित्रफीत समाज माध्यमात टाकण्यात आल्यावर लांबच्या प्रवासाला निघाल्यावर अशा प्रसंगाला कोणालाही तोंड द्यावे लागू शकते. त्यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे आणि सर्पमित्रांकडून ऐनवेळी कशी तातडीची मदत होऊ शकते, त्याची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे.