नाशिक : सातपूर येथील महादेव वाडीलगतच्या नाल्यात शनिवारी रात्री  अवाढव्य अजगर आढळून आल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. वन विभागाने सर्पमित्रांच्या मदतीने अजगराला पकडून नंतर नैसर्गिक सानिध्यात सोडून दिले. या अजगराची लांबी सुमारे आठ फूट, तर वजन २० किलो होते.

सातपूर हा कामगार वसाहतीचा भाग आहे. महिंद्रा चौकालगत महादेव वाडी परिसरातून नासर्डी नाला जातो. या नाल्यात शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मोठय़ा आकाराचा साप स्थानिक नागरिकांना दिसला. त्यांनी त्याची माहिती स्थानिक सर्पमित्र व्ही. एम. स्वामी यांच्यासह वन विभागाला दिली. स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तो साप म्हणजे अजगर असल्याचे लक्षात आले. त्यांनी अजगराला पकडून तो वन विभागाच्या स्वाधीन केला. वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच इको संस्थेचे सदस्य वैभव भोगले, एकनाथ मंडळ, सागर यांच्या मदतीने अजगराला अन्यत्र निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितपणे सोडण्यात आले. यावेळी एम. एस. गोसावी, नाशिकचे वनपाल अनिल अहिरराव आणि जगदीश आयतूक उपस्थित होते. शहरात अजगर दिसण्याची ही काही पहिलीच घटना नाही. नदी, नाले तसेच दाट झाडींच्या ठिकाणी अजगर वास्तव्य करतात. जुने वाडे वा तत्सम ठिकाणी अजगर आढळल्याची उदाहरणे असल्याचे वनपाल अहिरराव यांनी सांगितले.

Story img Loader