मालेगाव : येथील किदवाई रस्त्यावरील भ्रमणध्वनी व फर्निचरच्या आठ दुकानांना रविवारी लागलेल्या आगीत सुमारे ५० लाखांचा ऐवज खाक झाला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
यंत्रमाग कामगारांची मोठ्या प्रमाणावर वस्ती असलेल्या मालेगाव शहरात अरुंद रस्त्यांची संख्या अधिक आहे. रस्ते अरुंद असल्याने समस्याही अधिक आहेत. या अरुंद रस्त्यांच्या दुतर्फा दुकाने आहेत. त्यात किरकोळ विक्रेते, हातगाडींवरुन माल विकणारे फिरते विक्रेते यांची संख्या अधिक आहे. संवेदनशील शहर अशी ओळख असलेल्या मालेगावात काही अनुचित प्रकार घडल्यास अरुंद रस्त्यांमुळे वेळेवर मदत पोहचविण्यात अडचणी येतात. मालेगावातील समस्यांविषयी नागरिकांकडून कायमच महापालिकेकडे तक्रारी केल्या जात असल्या तरी अस्वच्छता, अतिक्रमण हे विषय कायम आहेत. सततच्या अस्वच्छतेचा परिणाम रहिवाशांच्या आरोग्यावरही होत आहे. या समस्येला तोंड देतानाच घायकुतीला आलेल्या प्रशासनासमोर अचानक काही घटना घडल्यास संकट उभे राहते. रविवारी सकाळी असाच एक प्रकार घडला.
शहरातील सततच्या वर्दळीचा आणि रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारची दुकाने असलेल्या किदवाई रस्त्यावरील एका फर्निचरच्या दुकानातून धूर निघत असल्याचे प्रारंभी काही जणांना दिसले. दुकानातून आगीमुळे धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमनच्या गाड्या येईपर्यंत आगीने रौद्रस्वरूप धारण केले. तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी शक्य होईल त्यानुसार आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले होते. एकमेकांना खेटून अनेक दुकाने असल्याने आग पसरल्यास मोठ्या प्रमाणावर दुकानांचे नुकसान होण्याची शक्यता होती. फर्निचरच्या दुकानाच्या आजूबाजूला भ्रमणध्वनी दुरुस्तीची काही दुकाने आहेत. काही क्षणात आगीने आजूबाजूच्या दुकानांना कवेत घेतले. आगीत एकूण आठ दुकानांमधील मुद्देमाल भस्मसात झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मालेगाव मुख्यालय, सोयगाव आणि द्याने येथील अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर अडीच तासांनी आग नियंत्रणात आली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथकाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीचे कारण समजले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.