नाशिक : जळगाव शहरातील वाघनगर बस थांब्याजवळ मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या आठ ते १० जणांच्या टोळक्याने गोळीबार केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, पोलिसांना हल्ल्याच्या घटनेमागे जुन्या वैयक्तिक वादाचे कारण असल्याचा संशय आहे. हल्लेखोरांकडून घटनास्थळी गोळीबारानंतर दोन दुचाकींची तोडफोड करण्यात आली. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेसाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वत्र कार्यवाही करण्यात येत असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत असतानाही गोळीबाराची घटना घडली. समता नगरातील रहिवासी अक्षय तायडे (२६) आणि अक्षय लोखंडे (२१) हे दोन तरुण दुचाकी उभी करुन उभे असताना आठ ते १० जणांचे टोळके आले. टोळक्याने तायडे आणि लोखंडे यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी सुरुवातीला दोघांना मारहाण सुरू केली. नंतर गोळीबार केला. एक गोळी तायडेच्या मांडीला चाटून गेल्याने तो जखमी झाला. लोखंडे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर टोळक्याने दोघांच्या दुचाकींची तोडफोड केली.

हेही वाचा…शिवसेना शिंदे गटाचा अजित पवार गटाला धक्का, हेलिकॉप्टरमधून एबी अर्ज आणून देवळाली, दिंडोरीत बंडखोरी

हा वाद पूर्ववैमनस्यातून झाला असून, मंगळवारी दुपारी एका उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली होती, असे सांगितले जाते. रामानंदनगर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घटना घडून देखील पोलिसांना त्याचा थांगपत्ता नव्हता. तब्बल तासाभराने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहचले.