नंदुरबार नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रमशाळेच्या एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नंदुरबार तालुक्यातील लोय येथे शासकीय आश्रमशाळा आहे. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास आनंद वसावे हे खोलीकडे जात असताना त्यांनी इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेल्या जोल्या वसावे यास, आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेला मनोहर कालूसिंग वसावे (आठ) हा नवीन वसतिगृहाच्या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात जखमी अवस्थेत पडला असल्याचे सांगितले. सदरची माहिती मुख्याध्यापक जितेंद्र माळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ मिळेल त्या वाहनाने मनोहर यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.
हे ही वाचा…समृध्दीचे काम होईपर्यंत नाशिक-मुंबई महामार्गावर अडचणी – छगन भुजबळ यांचा दावा
मनोहर यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेल्यावर डॉ. जय पटले यांनी त्याची तपासणी करुन त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषीत केले. पहाटेच्यावेळी प्रात:विधीसाठी गेला असता मनोहरवर बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुख्याध्यापक माळी यांनी दिलेल्या माहितीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने भेट दिली.
हे ही वाचा…अंबड प्रकल्पग्रस्त आंदोलनावर ठाम, लोणीपर्यंत अर्धनग्न मोर्चा
लोय येथील आश्रमशाळेत ७८१ विद्यार्थ्यांसाठी अवघे चार स्वच्छतागृह आहेत.यामुळे अनेक विद्यार्थी प्रात:विधीसाठी बाहेर जातात. नूतन वसतिगृहाचे काम सुरु आहे. परंतु, ते संथपणे होत असल्याने अद्याप शाळेच्या ताब्यात देण्यात आलेले नाही. गेल्या महिन्यात राज्यपालांच्या दौऱ्याची चर्चा असल्याने ठेकेदाराकडून वसतिगृह इमारतीच्या कामाला गती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काम थंडावले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रात:विधीसाठी बाहेर जावे लागत आहे. यामुळे पुन्हा हिंस्त्र प्राण्यांची शिकार होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे.