लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: मणिपूर येथे आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मणिपूरमध्ये तीन ते चार महिन्यांपासून हिंसाचार सुरु असून आदिवासींवर होणारे खोटे गुन्हे तत्काळ रद्द करण्यात यावेत, यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शनिवारी एकलव्य संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मणिपूर येथील आदिवासींवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. आरोपींना फाशी द्यावी, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरुन गुन्हा दाखल करण्यात यावा, कोपरगांव येथील मयत रेणुका गांगुर्डे हिच्या मृत्युस जबाबदार असलेले स्थानिक आरोग्य केंद्राचे संबंधित कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, मणिपूर घटनेचा निषेध नोंदविणाऱ्या आदिवासींवर पोलीस प्रशासनाकडून दाखल बनावट गुन्हे रद्द करावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मोर्चात नाशिकसह कोपरगाव आणि इतर भागातून अनेक जण सहभागी झाले होते. येथील गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चा निघाला. जिल्हा परिषद, शालिमारमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोर्चा आल्यावर सीबीएस परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. मोर्चाचा समारोप होत असतांना शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांची गर्दी झाली. बसचा खोळंबा झाल्याने विद्यार्थ्यांना या कोंडीत अडकून पडावे लागले.