बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर संघर्ष करीत, मेहनत करीत शिवसेना वाढविली, विस्तार केला. धनुष्यबाणाला वेगळी प्रतिष्ठा निर्माण करून दिली. मात्र, आज उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोघांच्या भानगडीत शिवसेना दुभंगली गेली आहे, धनुष्यबाण मोडला गेला आहे. हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हिताचे नाही. दोघांच्या भांडणात भाजपला संधी निर्माण झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.
हेही वाचा- “आमची चिंता आम्ही करू, तुम्ही काय गमावले ते बघा”; अंबादास दानवे यांचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी आमदार खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, की धनुष्यबाण गोठविले जाणे अर्थात शिवसेनेचे नावही गोठवलं गेलं आहे, हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हिताचे नाही. कारण, प्रमुख असलेल्या शिवसेना पक्षाचे तुकडे पडले असून, कमजोर झाली आहे. यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुतीने उभा आहे. शिवसेनेचे तुकडे पडल्यामुळे भाजपला मजबूत करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तशी संधी भाजपला प्राप्त झाली आहे. आता एकमेकांना दोष देण्यात अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी काय केले, शिंदेंनी काय केले यापेक्षा धनुष्यबाण मोडले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शिवसेनेत जे काही सुरू आहे, ते म्हणजे खुन्नसचे राजकारण आहे. त्यातून विकासाचे प्रश्न बाजूला पडत असल्याची टीकाही आमदार खडसे यांनी केली.
हेही वाचा- धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला ‘ते’च जबाबदार ; आमदार संजय गायकवाड
शिवसेनेच्या बाबतीत एकमेकांना दोष देण्यात अर्थ नाही. ठाकरे-शिंदेंनी काय केले? यापेक्षा धनुष्यबाण मोडला, हे नाकारता येत नाही. चुका होत राहतात. मात्र, एखादी चूक इतकी मोठी नसावी की यामुळे पक्ष संपेल, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आता न्यायालयाचा निर्णय काय लागेल, याकडे लक्ष आहे. न्यायालय वेगळा निर्णय देईल, असे वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकमेकांना शत्रू मानत राहिलो, तर राज्याचा विकासावर स्वाभाविकपणे परिणाम होतोच. पक्षांतर्गत वाद असतो, विरोध असतो, व्यक्तिगतही मतभेदही असू शकतात; परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून प्रश्न घेऊन एकत्र येण्याची भूमिका बजावण्याची गरज आहे. काही प्रश्न राजकारणापलीकडचे असतात. मात्र, सध्याचे ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्यामुळे विकासाचे प्रश्न बाहेरच राहत असल्याची खंतही आमदार खडसे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा- नामवंत शिकवणी वर्गात वित्त कंपन्यांचा शिरकाव ; पालकांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात सोमवारी जिल्हास्तरीय बैठक झाली. यावेळी आमदार खडसे यांनी, पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी पक्षासह विविध आघाड्यांचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, सोशल मीडियाप्रमुख व पदाधिकार्यांनी समन्वय साधून आपापल्या तालुक्यात अधिक कार्यशील होण्याचे आवाहन केले. सध्या पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली, आता माजी आमदार दिलीप वाघ यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली आहे. या यात्रांना त्या त्या मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ठिकाणी बूथरचना झाली पाहिजे. एका बूथवर तीस कार्यकर्ते नियुक्ती करावी. पक्षाच्या प्रत्येक आघाडीची रचना करावी. जिल्हाभर पक्षाची सभासद नोंदणी सुरू आहे. ती बूथनिहाय करावी, असे आमदार खडसे यांनी सांगितले.