जळगाव : भाजपला ऑक्टोबर २०२० मध्ये सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आता पुन्हा स्वगृही अर्थात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगाव जिल्ह्यात खडसे हे सेना-भाजप युतीत असतानाही त्यांचे सेना नेते गुलाबराव पाटील यांच्याशी कधी फारसे जमले नाही. आता तेच गुलाबराव जिल्ह्यात महायुतीमध्ये खडसे यांच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. इतकेच नव्हे तर, सुबह का भुला, शाम को घर वापस आये तो उसे भुला नहीं कहते, अशा शब्दांत त्यांनी खडसे यांना त्यांची चूक उमगल्याचे सूचित केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील इंद्रप्रस्थनगरातील सभागृहात शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा झाला. मेळाव्यानंतर शिंदे गटाचे मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाची भूमिका मांडली. नाथाभाऊ हे आठ किंवा नऊ एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आपल्याकडे कुणी नवी कार्यकर्ता आला तर राग येतो. हा आला तर कसे होईल, असे आपण त्या कार्यकर्त्याबाबत विचार करतो. आता बघा तिकडे गेलेला माणूस, आमदार झालेला माणूस हा पुन्हा भाजपमध्ये येत आहे. मूळ विचारधारेत येत आहे. त्यामुळे खडसे यांचे जिल्ह्यात निश्चितच स्वागत होईल, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा…नाशिक जिल्ह्यातील १० हजारहून अधिक जलस्त्रोतांची तपासणी
खडसेंची जुने भाजपचे कार्यकर्ते म्हणून ओळख होती. मंत्री म्हणून ओळख होती. त्यांनी विचारधारा सोडल्यानंतर बर्याच वेळा टीकाही केली; पण आता मूळ विचारधारेतच येत आहेत. त्यामुळे आम्ही त्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. ते सर्व आम्ही विसरून जाऊ आणि आता जिल्ह्यात नवा अध्याय सुरू करू, असे त्यांनी नमूद केले.