नाशिक : शिवसेना दुभंगल्यानंतर सर्वात प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणारे सुहास कांदे आणि सर्वात शेवटी गुवाहाटीला जाणारे दादा भुसे या विद्यमान आमदारांच्या उमेदवारीवर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नांदगाव आणि मालेगाव बाह्य या दोनच मतदारसंघात आमदार होते. महायुतीच्या जागा वाटपात आणखी काही जागा मिळविण्याचे पक्षाचे प्रयत्न होते. मात्र, नाशिक मध्य आणि निफाड वगळता मित्रपक्षांनी आपल्या विद्यमान आमदारांच्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केल्यामुळे शिंदे गटाच्या हाती वाढीव जागा लागण्याची शक्यता धुसर झाली आहे. नाशिक मध्यच्या जागेवरून भाजप- शिंदे गटात रस्सीखेच कायम आहे.
शिंदे गटाने रात्री उशिरा राज्यातील ४५ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली. यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, नांदगाव या दोन मतदारसंघांचाही समावेश आहे. मालेगाव बाह्यमधून पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावमधून सुहास कांदे या आमदारांना मैदानात उतरवले आहे. मागील निवडणुकीत एकसंघ शिवसेनेने भाजपबरोबर जिल्ह्यात उपरोक्त दोन मतदारसंघांसह देवळाली, इगतपुरी, दिंडोरी, निफाड अशा एकूण सहा जागा लढविल्या होत्या. यावेळी तितक्या जागा पक्षाला मिळू शकल्या नाहीत. कारण, शिंदे गटाने लढविलेल्या देवळाली, दिंडोरी, इगतपुरी आणि निफाडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. आमदाराच्या पक्षाला जागा या सूत्रामुळे त्या जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता मावळली. देवळाली हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गतवेळी एकसंघ शिवसेना तिथे पराभूत झाली. अजित पवार गटाच्या या जागेसह इगतपुरी, दिंडोरी आणि भाजपच्या ताब्यातील नाशिक मध्य या मतदार संघासाठी शिंदे गट आग्रही राहिला. मात्र बुधवारपर्यंत मित्रपक्षांनी आपापल्या जागांवर उमेदवारांची घोषणा केली. नाशिक मध्य, निफाड हे दोन मतदारसंघ त्यास अपवाद राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार नाशिक मध्य मतदारसंघात पिछाडीवर होता. सर्वेक्षणात ही जागा भाजपसाठी अनुकूल नसल्याने ती शिंदे गटाला देण्याची मागणी करण्यात आली. या मतदारसंघात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे तिकीटासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत या मतदारसंघाचा समावेश नसल्याने ही जागा अजूनही शिंदे गटाला मिळू शकते, यादृष्टीने पदाधिकारी मोर्चेबांधणी करीत आहेत.
हे ही वाचा… धुळे: अबब…१६ तलवारी, ६ बंदुका, ८ जिवंत काडतुसे आणि…
u
गतवेळच्या तुलनेत चार जागांची वजाबाकी
मागील निवडणुकीत एकसंघ शिवसेनेने भाजपबरोबर जिल्ह्यात मालेगाव बाह्य, नांदगाव, देवळाली, इगतपुरी, दिंडोरी, निफाड अशा एकूण सहा जागा लढविल्या होत्या. यावेळी तितक्या जागा महायुतीत पक्षाला मिळू शकल्या नाहीत. शिंदे गटाने लढविलेल्या देवळाली, दिंडोरी, इगतपुरी आणि निफाडमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार आहेत. या जागांवर त्यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. गतवेळी लढविलेल्या जागांच्या तुलनेत शिवसेनेच्या चार जागा कमी होणार आहेत. या जागांवर उमेदवारी मिळेल, या आशेने मधल्या काळात अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत अधिक जागा लढविण्याची संधी दुरावत असल्याने नाशिक मध्यची जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे.