उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा फार पूर्वीपासून होती. मात्र, बाळासाहेबांनी ते कधी होऊ दिलं नाही. कारण बाळासाहेबांना यांची क्षमता माहिती होती, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना कधीही जनतेची सहानुभूती मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“बाळासाहेबांना कधीही सत्तेचा मोह नव्हता. ते नेहमी किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. मात्र, उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह आहे. त्यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा फार पूर्वीपासून होती. पण बाळासाहेबांनी हे कधी होऊ दिलं नाही. कारण बाळासाहेबांना यांची क्षमता माहिती होती. केवळ एरिअल फोटो काढून राज्य चालवता येत नाही, हे बाळासाहेबांना माहिती होतं. आज बाळासाहेब असते तरी यांना कधीच मुख्यमंत्री केल नसतं”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

हेही वाचा – “तीन हजार व्होल्टेजचा शॉक कसा असेल? जाळ होणार जाळ”; बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

“घरी बसणाऱ्यांना कोणीही सहानुभूतीची देत नाही”

“आज ठाकरे गटाचे लोक म्हणत आहेत की आमच्या बाजुने सहानुभूतीची लाट आहे. मात्र, बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणाऱ्यांना आणि घरी बसणाऱ्यांना कोणीही सहानुभूतीची देत नाही. लोकांना काम हवं असतं. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. मात्र, उद्धव ठाकरे केवळ फेसबुक लाईव्ह करून घरात बसले होते”, असेही ते म्हणाले.

“…तर हे लोक मतदारांनाही गद्दार म्हणतील”

“आपल्या सरकारने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर असं केलं होतं. त्याविरोधात महाविकास आघाडीचे लोक न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. आता ते न्यायालयालाही गद्दार म्हणू शकतात. उद्या जर निवडणुकीत मतदारांनी यांना साथ दिली नाही, तर ते मतदारांनाही गद्दार म्हणायला मागेपुढे बघणार नाही”, अशी खोचक टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्ते आणि नेते संपवण्याचं काम केलं. शिवतीर्थावरील सभेत त्यांनी मनोहर जोशी यांना व्यासपीठावरून खाली पाठवलं, त्यांचा अपमान केला. आणखी एका सभेत असाच प्रकार रामदास कदम यांच्याबरोबर होणार होता, त्यावेळी मी त्यांना सभेला येऊ नका म्हणून सांगितले होतं.”

हेही वाचा – “…तर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील”, शरद पवार गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

यावेळी बोलताना त्यांनी संविधान बदलण्याच्या आरोपांनीही प्रत्यूत्तर दिलं. “बाबासाहेबांचं संविधान कोणीही बदलू शकत नाही. या संविधानानुसारच देशाचा कारभार चालतो. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे संविधान बदलण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. खरं तर निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसने केला होता. काँग्रेसने केवळ बाबासाहेबांचा अपमान केला आहे”, असे ते म्हणाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde criticized uddhav thackeray in nashik mahayuti rally spb