मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पाचोऱ्यातील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. किशोर पाटील पत्रकाराला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. पण, ती क्लीप माझीच आहे. माझ्या नेत्यासाठी मी पत्रकाराला शिव्या दिल्या आहेत, असं किशोर पाटील यांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या मुलीच्या कुटुंबीयांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली होती. पण, यावरून एका पत्रकाराने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याचं सांगितलं जात आहे. याच प्रकरणावरून किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली आहे.
हेही वाचा : अमित शाहांना भेटल्याच्या चर्चेंवर जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “अनिल देशमुख, राजेश टोपे अन् मी…”
‘पत्रकाराला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ती तुमचीच आहे का?’ असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर किशोर पाटील म्हणाले की, “ती क्लीप माझीच आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. सत्य सांगण्याची हिंमत माझ्यात आहे.”
हेही वाचा : VIDEO : “अमित शाह गुजरातचे, पण त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम, कारण…”, अजित पवार यांची फटकेबाजी
“जळगावात घडलेल्या दुर्दैवी घटनेचं प्रत्येकजण सांत्वन करत आहे. मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाची धावपळ सोडून घटनेचं गांभीर्य पाहता, चिमुकलीच्या आई-वडिलांचं सांत्वन केलं. प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या. वकील देण्यासंदर्भात आई-वडिलांशी चर्चा केली. अशा स्थितीत एखादा पत्रकार मुख्यमंत्री चमकोगिरी करत आहेत, असं कसं बोलू शकतो? मग मी माझ्या नेत्यासाठी अशा पत्रकाराला शिव्या दिल्या आहेत,” असं स्पष्टीकरण किशोर पाटील यांनी दिलं.