निष्काळजीपणा जिवावर बेतला
नाशिक : करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचे आवाहन सातत्याने होत असताना सॅनिटायझर अनेकांच्या जिवावरही बेतत आहे. घरात गॅस सुरू असताना बाटलीमध्ये सॅनिटायझर भरण्याची बेफिकिरी के ल्याने स्फोट होऊन गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. उपनगर येथे ही घटना घडली.
करोना संसर्ग रोखण्यासाठी हातांसह इतर वस्तू निर्जंतुक करण्यासाठी बहुतांश जणांकडून सॅनिटायझरचा वापर के ला जात आहे. परंतु सॅनिटायझरचा वापर योग्य पद्धतीने न के ल्यास ते त्रासदायकही ठरू शकते. इंदिरानगर येथे घर निर्जंतुक करण्याच्या प्रयत्नात महिला भाजण्याचा प्रकार अलीकडेच घडला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती उपनगर येथे घडली.
अनिल सूचक (५६, रा. नवकार सोसायटी) हे रविवारी सायंकाळी राहत्या घरी स्वयंपाकघरात पाच लिटरच्या पिंपातून बाटलीत सॅनिटायझर भरत होते. अचानक शेजारी सुरू असलेल्या गॅसमुळे सॅनिटायझरने पेट घेतला. या वेळी झालेल्या स्फोटात ते गंभीर भाजले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकत त्यांचा मुलगा जिगर धावत आला. वडील भाजल्याचे पाहून त्यांच्या अंगावरील कपडे काढण्याच्या प्रयत्नात तोही भाजला.
गंभीर भाजलेल्या सूचक यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६८ टक्के भाजलेल्या सूचक यांचा बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.