नाशिक : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पाचव्या टप्प्यात नाशिक, दिंडोरी, धुळे लोकसभेची निवडणूक होणार आहे. धुळे मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील बागलाण आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या तीनही मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून तीन मेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक, दिंडोरी मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा आणि अपर जिल्हाधिकारी तथा दिंडोरीचे निवडणूक अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक कार्यक्रम व उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती यावेळी देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत २७, २८ एप्रिल आणि एक मे रोजी सार्वजनिक सुट्टी असून या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. चार मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी तर, सहा मे रोजी दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत आहे.

हेही वाचा…राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांचे अर्ज सोमवारी; महायुतीचा नाशिकमध्ये उमेदवार ठरेना

दोनपेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. एका मतदारसंघात उमेदवारांना चारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरता येणार नाहीत. अर्ज भरण्यासाठी उमेदवारासह केवळ पाच जणांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवाराला तीनपेक्षा जास्त वाहने १०० मीटर परिसराच्या आत आणता येणार नसल्याचे सूचित करण्यात आले. शपथपत्र, ना देय प्रमाणपत्र, राजकीय पक्षांचा एबी अर्ज, अनामत रक्कम, बँक खाते, उमेदवार छायाचित्र याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. तीन मे रोजी अर्ज दाखल होण्याची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी अर्धा तास आणि १० मिनिटे बाकी असताना ध्वनिक्षेपकावरून घोषणा केली जाईल, असे शर्मा यांनी सांगितले.

प्रस्तावकांविषयी मार्गदर्शक सूचना

उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे, त्याचे त्याच मतदारसंघातील मतदार हे प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारास एक मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक आहे. अपक्ष उमेदवार आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार यांना मतदारसंघातील १० मतदार प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. प्रस्तावक अशिक्षित असल्यास त्यांचा अंगठ्याचा ठसा निवडणूक निर्णय अधिकारी अथवा पदसिद्ध सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर प्रमाणित करून घेणे बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा…संजय राऊतांबाबत बोलून आम्हाला…”, गिरीश महाजनांची टीका

निवडणूक कार्यक्रम कसा आहे ?

उमेदवारी अर्ज दाखल करणे – २६ एप्रिल ते तीन मे (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
उमेदवारी अर्जांची छाननी – चार मे
उमेदवारी मागे घेणे – सहा मे दुपारी तीन वाजेपर्यंतमतदान – २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा
मतमोजणी – चार जून रोजी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदाम

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election process for nashik dindori and dhule lok sabha constituencies begins nomination filing commences psg