सहकार क्षेत्रातील जिल्हा बँकेनंतर सर्वांत मोठ्या असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, तीन नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दहा डिसेंबर रोजी मतदान होईल, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.
हेही वाचा >>>सुषमा अंधारेंच्या सभेपूर्वीच गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील स्वागतफलक गायब – ठाकरे गटातर्फे पोलिसांकडे तक्रार
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे व भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यात घमासान सुरू आहे, तर दुसरीकडे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीने दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.दरम्यान, दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत २०२०मध्येच संपली होती. मात्र, करोनामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ती मार्च २०२२ मध्ये उठविण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती शासनाकडून उठविण्यात आली असून, ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया सुरू होती, तेथून पुढे निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणातर्फे देण्यात आल्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. दूध संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.
हेही वाचा >>>दिवाळीनंतर कांदा दरात ७०० रुपयांची उसळी; क्विंटलला अडीच हजाराचा भाव
दूध संघाची मुदत उलटून गेल्यानंतही तत्कालीन अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांना मुदतवाढ मिळाली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दूध संघावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. तथापि, आमदार खडसे यांनी न्यायालयात जाऊन याला स्थगिती मिळविली. यानंतर दूध संघातील कथित गैरव्यवहार, गैरकारभार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या. यावरून आमदार खडसे यांनी थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच रात्रभर झोपून ठिय्या आंदोलन केल्याने राज्यभरात या दूध संघाच्या निवडणुकीबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे. याअनुषंगाने दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालीही गतिमान होणार आहेत.
हेही वाचा >>>नाशिक शहरात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी
असा आहे निवडणुक कार्यक्रम
तीन ते दहा नोव्हेंबरदरम्यान सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अकरा नोव्हेंबर रोजी उमेदवार अर्जांची छाननी होईल. चौदा नोव्हेंबर रोजी वैध उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात येईल. चौदा ते अठ्ठावीस नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी व चिन्हवाटप करण्यात येणार असून, दहा डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल. अकरा डिसेंबर रोजी सकाळी आठपासून मतमोजणी होईल.
मतदारसंघनिहाय जागा
खुला प्रवर्ग (तालुकानिहाय) १५ महिला राखीव- २, इतर मागासवर्गीय-१, अनुसूचित जाती-जमाती-१, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग-१ असे मतदारसंघनिहाय एकूण २० उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.