नाशिक – लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांची होणारी गर्दी पाहता तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. काळात सुरक्षा व्यवस्थेचा औद्योगिक वसाहतीतील कंपन्या तसेच कामगारांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी उपाय करण्यात आले आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामात नाशिक आणि दिंडोरी मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा >>> महाराष्ट्रात काही उमेदवार बदलणे राहून गेले, गिरीश महाजन यांची खंत
मतमोजणीवेळी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, उमेदवारांचे समर्थक यांच्यासह अन्य लोकांची होणारी गर्दी पाहता कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये तसेच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला लगाम बसावा, यासाठी पोलिसांच्या वतीने त्रिस्तरीय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले असून सामान्यांना या ठिकाणी प्रवेश नाही. याविषयी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली. मतमोजणी केंद्राजवळ सीआरपीएफ, एसआरपीएफ तसेच स्थानिक पोलिसांची सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. दोन उपआयुक्त, चार सहायक आयुक्त, ५६ अधिकारी, ३०० अंमलदार, शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक यासह अन्य पोलीस बंदोबस्त राहील. शहर परिसरात सर्वत्र बंदोबस्त राहणार असून गस्तीच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे कर्णिक यांनी सांगितले. समाज माध्यमांत आक्षेपार्ह्य संदेश टाकल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही कर्णिक यांनी दिला.
हेही वाचा >>> जळगावात पुन्हा एक हत्या; पंधरवड्यातील दुसरी घटना
मतमोजणी केंद्राजवळ सामान्यांना प्रवेशबंदी मतमोजणी केंद्र हे औद्योगिक वसाहत परिसरात आहे. मतमोजणीच्या वेळी या ठिकाणी सामान्य माणसांना प्रवेश दिला जाणार नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या आहेत. कंपन्यांमधील कामगारांना अटकाव करू नये, असा आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला आहे.