जळगाव : परवाना नूतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या जळगाव जिल्ह्यातील उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील विद्युत निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. तक्रारदार हे कंत्राटदार असून, ते शासनाची विजेची कामे करत असतात. त्यांच्याकडे परवाना असून, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदारांनी उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर (५२, रा. पार्वतीनगर, जळगाव) यांच्याकडे अर्ज केला होता.
संबंधित तक्रारदाराकडे सुरळकर यांनी १५ हजारांची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या पडताळणीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी नियुक्त केलेल्या पथकाने सापळा रचत मंगळवारी रात्री १५ हजारांची लाच स्वीकारताना विद्युत निरीक्षक सुरळकरच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा…नाशिकमध्ये आंदोलक आदिवासी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेश रोखला, सीबीएस चौकात ठिय्या
रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सुरळकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्ह्यातील लाचखोरांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. या अनुषंगाने पुन्हा अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही पैशांची मागणी केल्यास त्यास पैसे देऊ नयेत, अशा व्यक्तींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.