ग्रामीण भागात शेतीसाठी सोळा-सोळा तास वीज भारनियमन केले जात असतांना आठ तास होणारा वीजपुरवठाही अल्प दाबाने होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होत नाही तसेच वारंवार विद्युत पंप जळण्याच्या समस्या निर्माण होत असल्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. आधीच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून हा एक प्रकारचा ‘झटका’च असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील विजेची समस्या सोडविण्याबरोबरच नवरात्रोत्सव व दिवाळी या सणांच्या काळात भारनियमन रद्द करण्याची मागणी केली जात आहे. सध्या शेतीसाठी सोळा तास भारनियमन करण्यात येते. या काळात ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सिंगल फेज योजनेच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो. पण, अनेक ठिकाणी शेतांमध्ये ही व्यवस्था नसल्याने शेत वस्तीवरील रहिवाशांना अंधारात रात्र काढावी लागते. तसेच भारनियमना व्यतिरिक्त महावितरण कंपनीकडून आठ तास वीज पुरवठा करण्याचा दावा करण्यात येतो. परंतु हा दावा फसवा असल्याची प्रचिती जागोजागी येत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
मूळात सोळा तासांचे भारनियमन हा अतिरेक असतांना आठ तासांचा केला जाणारा वीजपुरवठाही नीट होत नाही. या काळात बऱ्याचदा वीज गायब असते. हा वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने वीज पंप सुरू होत नाहीत. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी ताटकळत बसून राहाण्याची वेळ येते. शिवाय वारंवार पंप जळण्याच्या घटना घडत असल्याने आर्थिक फटकाही सहन करावा लागतो, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. मालेगाव तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांतिक सदस्य डॉ.तुषार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली वाढते भारनियमन व अल्प दाबाने होणाऱ्या वीज पुरवठय़ाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महावितरण कंपनीच्या अभियंत्याची भेट घेतली. दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. विहिरींना आलेल्या थोडय़ाफार पाण्याच्या भरवश्यावर आता कांद्यासारख्या पिकांची लागवड करण्यात आली. तथापि, पंप चालत नसल्याने पाणी देता येत नाही. यात कंपनीने लक्ष घालावे, शेतीला किमान बारा ते चौदा तास वीजपुरवठा करावा, नवरात्रोत्सव व दिवाळी या सणांच्या काळात भारनियमन रद्द करावे अशी मागणी केली जात आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा