दर्शवत ग्राहकांना दंड
प्रकाशोत्सव साजरा करण्यात मग्न असणाऱ्या शहरवासीयांना महावितरणने दोन महिन्यांची एकत्रित देयके पाठवून धक्का दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यात मागील महिन्याचे देयक थकबाकी दाखवून १० ते ५० रुपयांपर्यंतच्या दंडाचा भरुदडही देण्यात आल्याच्या तक्रारी होत आहेत. महावितरणच्या विलंबाचा भार ग्राहकांवर टाकल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
ग्राहकांना दर महिन्याला वीज देयक देणे बंधनकारक आहे. मीटरवरील वीज वापराच्या आकडेवारीचे छायाचित्र काढल्यानंतर देयकांची छपाई होऊन ते वितरित केले जातात. जुने नाशिक परिसरात शेकडो ग्राहकांना महावितरणने सप्टेंबरची देयके दिली नाहीत. नंतर ऑक्टोबरच्या देयकात सप्टेंबरची देयके समाविष्ट करण्याची करामत केल्याचे दिसून येते. यामध्ये सप्टेंबरचे देयक थकबाकी म्हणून दाखविले गेल्याची तक्रार युवा सेनेचे महानगरप्रमुख गणेश बर्वे यांनी केली. देयकानुसार १० ते ४० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भरुदड ग्राहकांवर टाकला गेल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या संदर्भात भद्रकालीतील वीज कंपनीच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता छपाई झाली नव्हती, देयके वितरित करणाऱ्यांनी ती वितरित केली नसल्याची उत्तरे मिळाल्याचे बर्वे यांनी सांगितले. देयकाचा अभ्यास केल्यावर गतवेळचे देयक थकबाकी म्हणून दर्शविले आहे. त्यापोटी ग्राहकांवर अधिकचा बोजा टाकला गेला. महावितरणची चूक असताना त्याचा भरुदड ग्राहकांनी का सोसायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जुनी तांबट लेनमधील शांतिनिकेतन अपार्टमेंटमधील रहिवाशांपासून ते व्यावसायिक, व्यापारी, सहकारी आस्थापना, धार्मिक स्थळे अर्थात मंदिरे अशा सर्वाना या स्वरूपाची देयके वितरित झाली आहेत. जुने नाशिक भागात सुमारे ५० हजार वीज जोडण्या आहेत. संबंधितांकडे सप्टेंबरची थकबाकी दाखवीत महावितरण लाखो रुपये जमा करण्याच्या प्रयत्नात असल्याची भावना बळावली आहे.
तक्रारी केल्यास दंड माफ
महावितरणने ऑगस्टपासून मध्यवर्ती देयक प्रणाली सुरू केली. या माध्यमातून नियोजनपूर्वक आणि वेळेत देयक देण्याचा प्रयत्न आहे. जुनी व्यवस्था नवीन व्यवस्थेत रूपांतरित होऊन सुरळीत होण्यास काही कालावधी लागेल. या काळात काही ग्राहकांना देयके विलंबाने दिली गेली असण्याची शक्यता आहे. परंतु, संपूर्ण जुने नाशिक भागात असा प्रकार झालेला नाही. त्याचे प्रमाण अतिशय कमी असेल. ज्या ग्राहकांना सप्टेंबरची देयके आली नव्हती, ती ऑक्टोबरच्या देयकात थकबाकी दाखवून आकारणी झाली असेल त्यांनी महावितरणकडे तक्रारी केल्यास दंड माफ केला जाईल. – नितीन घुमरे, उपविभागीय अधिकारी, महावितरण कंपनी