नाशिक : शिर्डी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या खासगी बसला इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गावर मालवाहू वाहनाची धडक बसल्याने ११ जण जखमी झाले. सर्व जखमी घाटकोपर येथील रहिवासी आहेत.घाटकोपर येथील भाटवाडीच्या हिल सेवा मंडळ चाळीतील काही जण शनिवारी पहाटे शिर्डी येथे दर्शनासाठी खासगी प्रवासी बसमधून निघाले होते. इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गाने बस जात असताना शेणीत शिवारात सिन्नरकडून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाची बसला धडक बसली.

या अपघातात नेहा फणसेकर (४५), नितीन फणसेकर, जयश्री वंजारी, अनिता कांदाळकर, भारती हळदणकर, मानसी मासूलकर, नंदा मासूलकर, नागेश मासूलकर, मालती बांदिवडेकर, स्वाती फणसेकर, शुभम भांगे (चालक) हे जखमी झाले. या जखमींपैकी चालक भांगे आणि पुढील आसनावर बसलेल्या मानसी मासूलकर तसेच पाठीमागे बसलेले नितीन फणसेकर, स्वाती फणसेकर यांच्या हातापायांना, डोक्यास मार लागला आहे. अन्य लोकांना किरकोळ दुखापत झाली. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मालवाहू वाहनाचा चालक अपघाताची माहिती न देता वाहन अपघातस्थळी सोडून पळून गेला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत भामरे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने घोटीजवळील एसएमबीटी सेवार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेहा फणसेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.