त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी सेवा समितीच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या निवृत्ती चावरे या विद्यार्थ्यांचा शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एल्गार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच आदिवासी मुलांच्या निवासी आश्रम शाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याची मागणीही केली आहे. येथील एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक यांना मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले.
हेही वाचा >>> नाशिक : संसार टिकत नसल्याने बालिकेला गळफास देत मातेची आत्महत्या
शालेय प्रशासनाने मुलांच्या आरोग्याची वेळीच काळजी घेतली असती तर निवृत्तीचा जीव वाचला असता, असे संघटनेने म्हटले आहे. या आश्रमशाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी केली जात होती की नाही, याची देखील चौकशी करावी आणि जिल्ह्यातील सर्व अनुदानित व शासकीय निवासी आश्रमशाळांमध्ये आरोग्य तपासणीविषयी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम लचके, सचिव जयराम बदादे, भावडू निरगुडे, तालुका उपसचिव मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.