नंदुरबार : आदिवासी उपयोजना अंतर्गत नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण, महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना आणि रुग्णाच्या एका नातेवाईकास आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित संस्थेची सुमारे दीड वर्षांपासून जवळपास दोन कोटी रुपयांची देयकेच न दिल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे जेवण बंद करण्याची नामुष्की वैद्यकीय महाविद्यालयावर ओढवली. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या हस्तक्षेपानंतर किमान महिनाअखेरपर्यंत जेवण सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत लवकरच तोडगा काढणार येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.संजय राठोड यांनी दिली.
आदिवासी उपयोजना अंतर्गत नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण, महिला व बाल रुग्णालय येथील रुग्णांना तसेच रुग्णाच्या एका नातेवाईकास १४ जून १९९४ च्या शासन निर्णयानुसार मुंबईतील मे. डी. एम.एन्टरप्रायझेस या संस्थेकडून आहार पुरवठा केला जात आहे. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दाखल झालेल्या रुग्णाबरोबर त्याच्या नातेवाईकाची जेवणामुळे गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने रुग्णाबरोबर आलेल्या एका नातेवाईकास आहार देण्याची योजना सुरु केली आहे. परंतु, दीड वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन मुंबई हा विभाग सदर रुग्णाच्या एका नातेवाईकांच्या देयकांसाठी अनुदान प्राप्त करण्यासाठी तांत्रिक मान्यता देत नसून नातेवाईक आहार पुरवठा योजना आमच्या विभागास लागू नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे पुरवठादाराचे जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२४ असे एक वर्षापासून नातेवाईक आहारसेवेचे देयक प्रलंबित असल्याने पुरवठादाराने नातेवाईकांसाठी देण्यात येणारा आहार पुरवठा २१ मार्चपासून स्थगित करणार असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना कळविले. तरीही कोणतीच कार्यवाही न झाल्याने शुक्रवारपासून रुग्णांबरोबर आलेल्या एका नातेवाईकाला देण्यात येणारे जेवण बंद करण्यात आले. अचानक जेवण बंद झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाशी लोकसत्ता प्रतिनिधीने संपर्क साधल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाकडून तातडीने हस्तक्षेप करण्यात आला. यानंतर किमान मार्चअखेरपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी आहारसेवा सुरळीत ठेवण्याचे निर्देश संबंधित संस्थेला देण्यात आले. थकीत देयके देण्याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी सांगितले. यामुळे तूर्तास तरी जिल्हा रुग्णालयातील नातेवाईकांसाठी आहारसेवा सुरु ठेवण्यात येणार आहे.
आमच्याकडे पैसे नसल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. आम्हाला जेवण मिळणार नसेल तर आम्ही रुग्णाजवळ कसे थांबणार? -विमलबाई निकाळजे (रुग्णांचे नातेवाईक, चौपाळे)
आम्ही चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. बरोबर लहान मुलगा देखील आहे. आमचे गाव सुमारे २५ किलोमीटर दूर आहे. रुग्णालयाने जेवण बंद केल्याने आमचे हाल होत आहेत. -मुक्ता वळवी (रुग्णाचे नातेवाईक, श्रावणी)
नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण झाल्यानंतर सुमारे दीड वर्षांपासून आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना देत असलेली आहारसेवेची देयके प्रलंबित आहेत. यामुळे आम्हाला आहारसेवा बंद करावी लागत आहे. -मोहनदास महाले (व्यवस्थापक, डी. एम. एंटरप्रायजेस)
रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरविण्याची वैद्यकीय महाविद्यालयात राज्यात कोठेही तरतूद नाही. मात्र, आपण दीड वर्षांपासून सदरची सेवा सुरळीत सुरु ठेवली होती. संबंधित संस्थेचे सुमारे दोन कोटी रुपयांचे देयक थकल्याने त्यांनी आहारसेवा बंद केली. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार महिनाअखेरपर्यंत आहारसेवा सुरु ठेवण्याच्या सूचना संबंधित संस्थेला देण्यात आल्या आहेत.थकीत देयके नेमके कुठून द्यायची, याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. -डॉ. संजय राठोड (अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार)