नाशिक: शाळेत अटल टिंकरिंग प्रयोगशाळेसाठी नीती आयोगाने दिलेल्या अनुदानाचा गैरवापर करून दीड कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्या प्रकरणी महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थेच्या या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे, अपूर्व हिरे, संचालक मंडळ आणि संबंधित शाळांचे तत्कालीन मुख्याध्यापक यांच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशी अद्वय हिरे यांचे बंधू माजी आमदार अपूर्व हिरे यांच्याविरुध्द नोकरी देण्याचे अमिष दाखवून १० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकम घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश घेतल्यापासून हिरे कुटुंबियांवर एका पाठोपाठ एक गुन्हे दाखल होत आहेत. यापूर्वी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थेच्या काही शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला नियमबाह्यपणे मान्यता देऊन संबंधितांच्या वेतनापोटी लाखो रुपयांचे वेतन काढून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी या संस्थांचे तत्कालीन संचालक तथा माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजीमंत्री प्रशांत हिरे डॉ. अपूर्व आणि अद्वय हिरे यांच्यासह विद्यमान संचालक, शिक्षक व लिपिकासह तत्कालीन शिक्षणाधिकारी अशा एकूण ९७ जणांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
हेही वाचा… नाशिक : सुसाट दुचाकी चालविणाऱ्यांसह टवाळखोर लक्ष, पोलिसांकडून कारवाई
आता या संस्थांच्या १० शाळांना केंद्र सरकार पुरस्कृत अटल टिकरिंग लॅबसाठी दिलेल्या अनुदानात एक कोटी ५६ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर संबंधित शाळा मुख्याध्यापक व संंस्थाचालक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले होते. शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवत १० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चार जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
निकषानुसार साहित्य, विद्यार्थी व जागाही नाही…
या दोन्ही संस्थांच्या १० शाळांना नीीती आयोगाने अटल टिकरिंग प्रयोगशाळा मंजूर केलेली आहे. त्याकरिता नऊ शाळांना प्रत्येकी १२ लाख याप्रमाणे एक कोटी ५६ लाखांचा निधी दिला गेला. या निधीच्या मर्यादेत प्रयोगशाळेत साहित्य नाही. निधीचा कुठलाही ताळमेळ बसत नाही. मुख्याध्यापकांनी नीती आयोगाच्या संकेतस्थळावर दिशाभूल करणारी व चुकीची माहिती भरून प्रयोगशाळेसाठी मंजुरी मिळवली. प्रयोगशाळेच्या निकषानुसार शाळेत दीड हजार विद्यार्थी नाही आणि प्रयोगशाळेसाठी दीड हजार चौरस फूट जागा नाही. शाळांनी अनुदान कुठे खर्च केले याची स्पष्टता होत नाही. त्यामुळे २०१९ ते २०२३ या काळात दोन्ही संस्थांतील शाळांचे तत्कालीन मुख्याध्यापक, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळाने संगनमताने अनुदानाचा गैरवापर करून आर्थिक अपहार केल्याचे शिक्षण विभागाने तक्रारीत म्हटले आहे.
राजकीय आकस ठेऊन गुन्हे
भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा अवैधरित्या नोंदविला गेला असून त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ज्या शाळांमध्ये अटल प्रयोगशाळेसाठी अनुदान प्राप्त झाले, त्या ठिकाणी प्रयोगशाळा अस्तित्वात असून योग्य प्रकारे सुरू आहे. नीती आयोगाकडून कुठलीही तक्रार आलेली नाही. आरोप व गुन्हे केवळ राजकीय आकस ठेवत नोंदविला गेला आहे. उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार व संशयितांना आपण व्यक्तिश ओळखत नाही. यात विनाकारण मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. – डॉ. अपूर्व हिरे (समन्वयक, महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती)