मालेगाव : पंधरा वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने वाहनतळांसाठी प्रस्तावित केलेल्या जागा खासगी व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याची तक्रार येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे करण्यात आली आहे. शहराला सतावणाऱ्या विविध समस्यांची तड लावण्यासाठी येथील सार्वजनिक नागरी सुविधा समिती आग्रही आहे. त्यासाठी काही दिवसांपासून अनेकदा समितीतर्फे आंदोलन करण्यात आले आहे.
पंधरवाड्यापूर्वी समितीतर्फे येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून महापालिकेपर्यंत लोटांगण आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत नवनियुक्त आयुक्त रवींद्र जाधव यांनी याप्रश्नी लवकरच बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जाधव यांनी बैठक घेतली.
हेही वाचा…नाशिकमधील साल्हेर किल्ल्याची गुजरातच्या युवकांकडून स्वच्छता
शहरात वाहनतळांची कुठलीही सोय नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरच वाहने उभी केली जातात. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अपघातही होतात. ही समस्या दिवसेंदिवस उग्र रुप घेत असताना पोलीस व पालिका प्रशासन ढिम्मच असल्याची तक्रार समितीने बैठकीत केली. तसेच तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शासकीय आणि महापालिका मालकीच्या जागा असणारी १८ ठिकाणे वाहनतळांसाठी प्रस्तावित केली होती.
मात्र नंतरच्या काळात पालिका प्रशासनाने या संदर्भात कुठलीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे या मोकळ्या भूखंडांवर अनेक ठिकाणी खासगी व्यक्तींनी पक्की बांधकामे केली. वाहनतळांसाठी प्रस्तावित जागांवर अशा प्रकारे अतिक्रमणे थाटली गेल्याने वाहनतळ निर्माण करणे अवघड झाले आहे, याकडे समितीने पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. यावर वाहनतळांसाठी प्रस्तावित जागांवर कोणकोणत्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, याचा शोध घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले.
हेही वाचा…नाशिक महानगरपालिकेच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे ; भाजप आमदाराचा संताप
पाणीपट्टीत करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, इस्लामाबाद भागातील मुख्य जलवाहिनी बदलणे, सरदार मार्केट ते उर्दू लायब्ररीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, भुयारी गटारीचे काम करताना नव्याने करण्यात येणारे रस्ते खोदण्याची वेळ येणार नाही, याचे योग्य ते नियोजन केले जाईल, असे आश्वासनही आयुक्त जाधव यांनी दिले. बैठकीस समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, शंकर वाघ, निखिल पवार, कैलास शर्मा, भरत पाटील, देविदास वाघ, फारुख कच्छी आदी उपस्थित होते.
वाहतूक कोंडीत भर
मालेगाव येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले जात आहे. शहरात वाहतूक व्यवस्था कायम कोलडत असून त्यास रस्त्यावरच उभी करण्यात येणारी वाहने कारणीभूत आहेत. वाहनतळांसाठी असलेल्या ठिकठिकाणच्या जागांवर अतिक्रमण झाल्याने वाहने उभी करावीत तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी, रस्त्यांवरच वाहने उभी राहत असल्याने मालेगावकरांना कोंडीला तोंड द्यावे लागते. सार्वजनिक नागरी सुविधा समितीने हा विषय पालिका आयुक्तांकडे मांडला आहे.