लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: शहराजवळील चामरलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे रविवारी मड बाथचा (माती स्नानाचा) सुमारे एक हजार अबालवृद्धांनी आनंद लुटला. संगीताच्या तालावर नाचून नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला. संपूर्ण शरीरावर मातीचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले की काय, असेच या भागातून ये-जा करणाऱ्यांना वाटत होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते.

महेशभाई शहा, चिराग शहा तसेच योगगुरुजी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नंदू देसाई यांच्यावतीने २६ वर्षांपासून उन्हाळ्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मध्यंतरी करोनामुळे दोन वर्षे या उत्सवात खंड पडला होता. गेल्या वर्षांपासून पुन्हा हा उत्सव सुरू झाला. या वर्षीसुद्धा लोकांचा उत्साह दांडगा होता. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागातील आणि नाशिक महानगरातील सुमारे एक हजार लोकांनी माती स्नानाचा आनंद घेतला.

आणखी वाचा- नाशिक पोलीस आयुक्तालयात २१ नवीन वाहने दाखल

महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात येते. वारुळाची माती गोळा केली जाते. आठ दिवस आधी ती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला ती लावून आंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते, असे नंदू देसाई यांनी सांगितले. सकाळी पावणे सहा वाजेपासून हा कार्यक्रम सुरू झाला. बघता बघता लोकांचे जत्थे येऊ लागले आणि स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले. पूर्वी एका पाटीत चिखल घेऊन प्रत्येकाला वैयक्तिकरित्या तो फासावा लागत होता. यावेळी २५ फूट लांबीची खास टाकी तयार करण्यात. त्यात चिखल होता. त्यात २५ ते ३० लोक एकाचवेळी उतरून अंगाला चिखल लावून बाहेर येत होते. नंतर दोन तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून स्नान करीत होते. या उपक्रमात माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल, प्रदीप पाटील, डॉ. ज्ञानेश्वर चोपडे आदींसह नाशिक सायकलिस्ट, जॉगर्स ग्रूप, जल्लोष ग्रूप, पंचवटी व्यापारी, नाशिक इको ड्राईव्ह, चामरलेणी इको ड्राईव्ह, मुंबई ग्रुप आदी गटातील सदस्य सहभागी झाले.

नाशिकमध्ये माती स्नानाचे आयोजन केले जाते. त्यासाठी मला आमंत्रित केल्याने आनंद लुटण्यासाठी आवर्जून आलो. माझ्यासाठी हा सुखद धक्काच ठरला. शेकडो लोकांना आमंत्रित करून इतका चांगला उपक्रम आणि त्यानंतर मिसळ पार्टी म्हणजे सारेकाही अभूतपूर्वच म्हणावे लागेल. -हरिष बैजल (माजी पोलीस आयुक्त)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm for mud bathing in nashik participation of dignitaries mrj