लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: औद्योगिक क्षेत्रातील केंद्राला व्यावसायिक दराने २८ लाखाचे देयक, एका उद्योजकाकडे २० वर्षांपूर्वीची वसुली काढण्याचा प्रकार, दिंडोरी तालुक्यात पैसे भरूनही न मिळणारी वीज जोडणी, ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतीत वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अशा एक ना अनेक तक्रारी उद्योजकांनी नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) कार्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासमोर मांडल्या. आठ दिवसांत त्यांचे निराकरण न झाल्यास उद्योग बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिल्यानंतर हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन कुमठेकर यांनी दिले.
उद्योगांशी संबंधित वीज पुरवठ्यातील समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने निमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बैठकीत सिन्नर, दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यातील उद्योजक आक्रमक असल्याचे चित्र दिसले. माळेगाव एमआयडीसीत उपकेंद्राचे काम सुरू करावे. तीन रोहित्रांचे ब्रेकर, गंजलेल्या पेट्या बदलणे, मनुष्यबळ वाढविणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी साहित्याची उपलब्धता करून वीज पुरवठा सुरळीत राखण्याची मागणी करीत सिन्नरच्या उद्योजकांनी महावितरणला कोंडीत पकडले.
आणखी वाचा-गुन्हेगारांविरोधात पोलीस आक्रमक; कारवायांना वेग
या अनुषंगाने कुमठेकर यांनी त्या परिसरातील अभियंत्यांची चांगलीच हजेरी घेतली. उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना फैलावरही घेतले. एका उद्योजकाने २० वर्षांपूर्वीची वसुली काढल्याची माहिती दिली. तर एका उद्योजकाने आपले औद्योगिक केंद्र असतानाही महावितरणने व्यावसायिक प्रमाणे तब्बल २८ लाख रुपये देयक पाठविल्याचे निदर्शनास आणले. ११ वर्षांपासून या उद्योजकाचा कारखाना आहे. असे असतानाही त्याला व्यावसायिक दराने देयक पाठविण्यामागील कारण काय, असा प्रश्न निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केला. त्याची सत्यता पडताळून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन कुमठेकर यांनी दिले. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
आणखी वाचा-पावसाअभावी मनमाडवर पाणी टंचाईचे सावट, खासगी विहिरी अधिग्रहणाची तयारी
पैसे भरूनही वीज जोडणीला दिरंगाई
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, खतवड, तळेगाव औद्योगिक वसाहतींसाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तळेगाव येथे १०० खासगी उद्योग थाटण्यात आले असून त्यांना नवीन जोडणी देण्यास विलंब का होतो, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. दिंडोरी तालुक्यात पैसे भरूनही जोडणी मिळत नाही. सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होतो. बोरगडला नवीन उपकेंद्र सुरू होऊनही विद्युत पुरवठ्यात फरक पडलेला नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन कुमठेकर यांनी दिले. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन त्यात उतरोत्तर सुधारणा कशी होईल, याची काळजी आम्ही घेऊ, असे कुमठेकर यांनी सांगितले.