नाशिक – नदी सर्वेक्षणासह, वृक्षारोपण, पर्यावरणप्रेमींशी चर्चा, असे कार्यक्रम जिल्ह्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत बुधवारी आणि गुरुवारी आयोजित करण्यात आले आहेत.
बुधवारी येवला तालुक्यातील कुसमाडी येथे डाॅ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते ‘चला जाणूया नदीला’ या महाराष्ट्र शासन व जलबिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १०८ नद्यांच्या सर्वेक्षण तथा पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत मोती नदीच्या उगमस्थानी नदीचे पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता बेलगाव ढगा येथे नंदिनी नदीच्या पाणलोटाची, तिथल्या पर्यावरण संवर्धन कामाची डॉ. सिंह पाहणी करतील. सायंकाळी साडेसहा वाजता परमानंद स्पोर्टस अकॅडमी येथे नीर-नारी नदी हा पर्यावरणीय नृत्याचा कार्यक्रम होईल.
हेही वाचा – नाशिक : शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास, पाच संशयित ताब्यात
हेही वाचा – महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात महाविकास आघाडीतर्फे पाचोर्यात आंदोलन
गुरुवारी राह फाउंडेशनच्या दरी, अंजनेरी, ब्रह्मगिरी येथील महत्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राह फाउंडेशन नाशिकमध्ये ४५ लाख झाडे लावणार असून, त्यांचे संगोपन करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात तीन स्थळांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात सहभागी असलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची, तसेच जल प्रहरींची बैठक नाशिक मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत महापालिकेत होईल. दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आयोजित केलेल्या टॅंकरमुक्त नाशिक या अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती नमामी गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित यांनी दिली.