नाशिक – प्रयागराज कुंभमेळ्यात नदीप्रदूषण हा कळीचा मुद्दा ठरल्यामुळे २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत नदी प्रदूषण विषयाला महत्व दिले जात आहे. पुढील काही महिन्यात आरोग्य हितासाठी गोदावरीचा नैसर्गिक प्रवाह कायम राहण्याच्यादृष्टीने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी काम करावे अन्यथा नदीचा वापर न करता सिंहस्थ कुंभमेळा कसा पार पडेल याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सादर करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी केली आहे.

प्रयागराज कुंभमेळ्यात नदी प्रदुषणाचे पडसाद उमटले होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीतही गोदाप्रदूषण प्रमुख विषय ठरु पाहात आहे. गोदावरीची प्रदुषणातून मुक्तीसाठी राजकीय पक्षांसह साधु,महंत आवाज उठवत आहेत. शहर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत गोदा प्रदूषण मुक्तीसाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना याबाबत निवेदन दिले.

निवेदनात गोदाप्रेमींनी आपली भूमिका मांडली आहे. न्यायालयीन आदेशानुसार २०१४ साली नीरी संस्थेने गोदावरी पुनरुज्जीवन अहवाल तयार केला. न्यायालयीन आदेशांची समिती सदस्यांकडून अंमलबजावणी करुन घेण्यासाठी उच्च न्यायालयाने स्थापित समिती अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयाने स्थापित समितीच्या विविध विभागांनी करावयाच्या कामांची यादी कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. वास्तविक, या कामाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विभागीय आयुक्तांची होती. न्यायालयाने याबाबत ठराविक मुदत ठरवून दिल्यानंतरही विषय प्रलंबित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यासंदर्भात विभागीय आयुक्त गेडाम यांनी तातडीने काम करावे अन्यथा नदी व नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नैसर्गिक प्रवाहरहित, प्रदुषित गोदावरी नदीच्या पाण्याचा वा नदीचा वापर न करता सिंहस्थ कुंभमेळा पार पाडण्याबाबत उच्च न्यायालयास लेखी स्वरूपात कळवावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. निवेदनावर नेहा श्रीवास्तव, जगबीर सिंह , मनीष बावीस्कर आदींची स्वाक्षरी आहे.