नाशिक: शहरी भागातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याने गोदावरीसह राज्यातील अनेक प्रमुख नद्या पानवेलींच्या (जलपर्णी) विळख्यात सापडल्या आहेत. दुषित पाण्यात फोफावणाऱ्या आणि परिसरात दुर्गंधी पसरविण्यास कारक ठरलेल्या पानवेलींच्या निर्मूलनासाठी अनेक उपाय अयशस्वी ठरल्याने आता तणनाशक फवारणीद्वारे गोदावरीतील पानवेलींच्या उच्चाटनाचा मार्ग अनुसरला जाणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (निरी) सहकार्याने महानगरपालिका प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबविण्याच्या तयारीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पानवेली प्रदुषित पाण्यात फोफावतात. गोदावरीत अल्पावधीत फोफावणाऱ्या पानवेलींवर नियंत्रण मिळवणे अवघड होत आहे. गोदावरीप्रमाणे राज्यातील प्रमुख शहरांतून वाहणाऱ्या नद्यांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. महापालिका ट्रॅश स्किमर यंत्राव्दारे पानवेली हटवते, पण ते प्रयत्न थिटे पडतात. त्यातून नदी कधीही पूर्णत: पानवेलीमुक्त झाल्याचे दिसले नाही. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होऊन तज्ज्ञांच्या देखरेखीत ग्लायफोसेट तणनाशक फवारणीचा प्रयोग राबविण्याचे निश्चित करण्यात आले.

हेही वाचा… नाशिकचे पीएफ प्रादेशिक आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात; दोन लाख रुपये लाचप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

ग्रामीण भागात नदीचे पाणी जनावरे पितात. नदीखालील भागात नांदुरमध्यमेश्वर हे पक्षी अभयारण्यही आहे. त्यामुळे हा प्रयोग महानगरपालिका हद्दीत केला जाईल. नदीच्या वरील भागात प्रयोग करून रामकुंडात स्वच्छ पाणी आणण्याचा विचार आहे. तणनाशकाची किती प्रमाणात फवारणी करायची, वाहत्या पाण्यात की स्थिर पाण्यात, हे अद्याप अस्पष्ट आहे. वाहत्या पाण्यात फवारणीनंतर तणनाशकाचे प्रमाण एखाद्या भागात एकवटलेले राहणार नाही. ते वाहून जाईल, असे निरीचे शास्त्रज्ञ सांगतात. तणनाशकाच्या अर्ध जीवन कालावधीचा संदर्भ देऊन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी धरणातून आवर्तन सोडले जाते, तेव्हा हा प्रयोग करण्याचे सुचविले.

हेही वाचा… सेवानिवृत्त शिक्षकांवर वाद्य वाजविण्याची वेळ का? धुळे महापालिकेसमोर आंदोलन

महानगर पालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी स्थिर आणि वाहत्या पाण्याचे नमुने घेऊन तणनाशकाचे नेमके प्रमाण किती राहील, हे तपासता येणार असल्याचे नमूद केले. निरीने यापूर्वी असा अभ्यास केलेला नाही. त्यांनी सैद्धांतिकदृष्ट्या अभ्यास करून अभिप्राय दिले. व्यावहारिकदृष्ट्या अभ्यास केलेला नसल्याने किती प्रमाणात तणनाशक फवारणी करावी, याविषयी निरीशी पत्रव्यवहार करून या प्रयोगाचे नियोजन केले जाणार आहे.

निरीची सावधगिरीची सूचना

नागपूरस्थित डॉ. सरवणा देवी यांनी ग्लायफोसेटबाबत अभिप्राय पाठविला आहे. त्यांनी या तणनाशकाच्या विषारीपणाचा अभ्यास केलेला नाही. हे तणनाशक थेट झाडांच्या पानावर लागू केले जाते. तोंडावाटे, श्वासाद्वारे, त्वचेच्या संसर्गातून याची विषाक्तता उंदरांमध्ये कमी दिसून आली. वेगवेगळ्या निकषात हे मानवासाठी अपायकारक असल्याचे निष्कर्ष नाहीत. तणनाशकाचा अर्ध जीवन कालावधी मातीत ४७ दिवस आणि पाण्यात ९१ दिवसापर्यंत आहे. गोड्या पाण्यातील अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हे किंचित विषारी असल्याने हे तणनाशक जलपर्णींवर फवारताना पर्यवेक्षणाची गरज निरी मुंबईचे शास्त्रज्ञ डॉ. नितीन गोयल यांनी मांडली आहे. सर्व घटकात त्याची विषाची तीव्रता कमी असल्याची नोंद आहे. जलपर्णींसाठी उपाय सुचविणाऱ्या डॉ. देवी यांना निमंत्रित करून महापालिका प्रत्यक्ष चर्चा करणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eradication of panvellis in godavari through herbicide spraying is to be followed due to sewage causing polluted water nashik dvr