एकाच वेळी बिबटय़ा आणि गर्दीवर नियंत्रणाचे आव्हान
कॉलनीत बिबटय़ा शिरल्याचे कळले आणि जो तो घराची दारे बंद करून गच्चीवर अथवा गॅलरीत जाऊन त्याची चाहूल घेऊ लागला. बिबटय़ा दोन-तीन बंगल्यांचे आवार, झाडीझुडपाच्या जागेत आसरा शोधत होता. वन विभागाचे पथक त्याला पकडण्यासाठी धडपड करीत होते. प्रारंभी शांत असणारा बिबटय़ा नंतर गर्दीच्या आरडाओरडामुळे आक्रमक बनला. समोर येईल त्याच्यावर हल्ला करीत तो बाहेर पडण्यासाठी वाट शोधू लागला. बघ्यांची गर्दी आणि गोंधळ यामुळे त्याला जेरबंद करण्याची कार्यवाही लांबली.
शुक्रवारी सकाळी दोन तासांपेक्षा अधिक वेळ गंगापूर रस्त्यावरील सावरकर नगर परिसराने बिबटय़ामुळे निर्माण झालेला थरार अनुभवला. या भयग्रस्त रहिवाशांनी बिबटय़ा आक्रमक होण्यामागे जमलेली बघ्याची गर्दी कारणीभूत ठरल्याचे सांगितले. मकालू हॉटेलमागे सपट व्हिला आणि परिसर आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबटय़ाने प्रवेश केल्याची माहिती वन विभाग, पोलिसांनी दिल्यानंतर स्थानिकांनी घराचे दरवाजे लावत गच्चीवर, गॅलरीत धूम ठोकली. याच ठिकाणी बहुमजली ऋषिकेश अव्हेन्यू इमारत आहे. तेथील रहिवासी हातची कामे सोडून क्रिकेटचा सामना पाहावा तसे बिबटय़ाचे दर्शन घेण्याकरिता गॅलरीत जमले. गंगापूर रस्त्यावरून हा अतिशय निकटचा भाग. रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्यांनाही मोह टाळता आला नाही. गर्दीमुळे गंगापूर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. बिबटय़ा आक्रमक झाल्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना दुसरीकडे बघ्यांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्याची कसरत पोलीस यंत्रणेला करावी लागली. या गोंधळातच बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना कॉलनीतून बाहेर आणून वाहनातून रुग्णालयाकडे मार्गस्थ केले जात होते. बिबटय़ामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांनी नियमांचे पालन केले. मात्र, बाहेरून आलेल्या बघ्यांनी अडथळे आणले, असे अलका आणि मनीषा पटेल यांनी सांगितले. मारवा हाऊस, शरयू आणि तथास्तू अशा तीन ते चार बंगल्यांमध्ये बिबटय़ा फिरत होता. लहान मुले शाळेत गेल्याने अनर्थ टळला. सर्वानी दरवाजे बंद केले. प्रारंभी शांत असणारा बिबटय़ा नंतर आक्रमक झाल्याचे यश आणि शीतल पटेल यांनी सांगितले. बघ्यांची गर्दी अन् पोलिसांची दमछाक
बिबटय़ाला पाहण्यासाठी गंगापूर रस्ता आणि सावरकर नगर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. यामुळे त्यास जेरबंद करण्याच्या मोहिमेत अडथळे आले. बिबटय़ाने चार जणांना जखमी केले होते. आक्रमक बिबटय़ा गर्दीच्या दिशेने पळाल्यास अनर्थ घडेल हे लक्षात घेऊन पोलीस बघ्यांना हटवण्याचा प्रयत्न करत होते; परंतु गर्दी काही केल्या मागे हटत नव्हती. त्यात महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांसह रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांचा समावेश होता. काही युवक दुभाजकावर उभे राहिले. परिसरातील गर्दीमुळे गंगापूर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना पाचारण करावे लागले. शीघ्र कृतिदलाच्या जवानांना बघ्यांना पिटाळण्याचे काम करावे लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता बघ्यांनी आपली असंवेदनशीलता अधोरेखित केली.