लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: जेईई आणि नीट परीक्षेसाठी निवासी स्वरुपाचे प्रशिक्षण उपलब्ध करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वतीने या वर्षीही सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. मार्च २०२३ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षासाठी ५५ (जेईई) आणि ५५ (नीट) अशा एकूण ११० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता दोन जुलै रोजी निवड चाचणी होणार असून इच्छुकांना अर्ज करण्यासाठी २६ जून ही अंतिम मुदत आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी सुपर ५० उपक्रम राबवला होता. ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात दोन जुलै रोजी निवड परीक्षा राबविली जाणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज पंचायत समितीतील गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करावा. प्रत्येक तालुक्यात परीक्षेसाठी केंद्र राहणार आहे.
आणखी वाचा-नेमेचि वीज पुरवठा खंडित, मालेगावातील खासगी वीज कंपनीवर मनमानीचा ठपका
या उपक्रमासाठी मार्च २०२३ मधील १० वीची परीक्षा ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज करु नये. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश घेणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याच्या पालकांच्या उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख रुपये असावी. उत्पन्नाचा दाखला ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध असावा. अधिवास (डोमिसाईल ) प्रमाणपत्र सादर करावे लागेल. विद्यार्थ्याचा अधिवास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी पात्र नाहीत.अनुसूचित जाती, जमाती या सामाजिक प्रवर्गाच्या विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असावा. अपंग विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना निवड चाचणी परीक्षा अनिवार्य राहील. या परीक्षेत अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड मर्यादित स्वरुपात करण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.