नाशिक – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लागू केलेल्या अभ्यासक्रमात जुन्याच पद्धतीने परीक्षा व गुणपद्धत अवलंबण्यात आली. गुण देताना मात्र प्रत्यक्षात नव्या रचनेनुसार (७०-३०) पद्धत अवलंबण्याची किमया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केल्याचे उघड झाले आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदव्युत्तर प्रथम वर्षाचा (एमए-एमसीजे) निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत विद्यापीठाच्या अजब कारभाराचा निकालावर परिणाम झाला असून टक्केवारी घसरली आहे. विद्यापीठाच्या गलथान कारभाराबद्दल विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. मागील काही वर्षांपासून विद्यापीठाच्या कार्यशैलीची नवनवीन उदाहरणे समोर आली. परंतु, यात सुधारणा होत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रथम वर्षाच्या परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी आपल्या विषयानुसार ५०-२५ प्रमाणेच सोडविल्या. परीक्षा तपासणी केंद्रावरील तपासणीसांनी त्याप्रमाणेच गुणपत्रक तयार करून विद्यापीठाला पाठवले. मात्र जाहीर झालेल्या निकालाने सर्वांना धक्का बसला. परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गुणांमध्ये बरीच तफावत आढळली. विद्यार्थ्यांना नव्या रचनेच्या पध्दतीनुसार ७०-३० वर आधारीत गुण देण्यात आले. त्यामुळे अंतर्गत गुणही बदलले. अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. काही विद्यार्थी अनुतीर्ण झाले. याबाबत विद्यापीठाच्या संबंधित विभागांकडे संपर्क साधूनही उडवाउडवीची उत्तरे मिळतात. काहींनी कुलगुरुंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. विद्यापीठाने नवी पध्दत पूर्वकल्पना देऊन पुढील सत्रापासून राबवावी, या पहिल्या सत्रात त्याचा विचार होऊ नये, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा डॉ. योगेश कुलकर्णी, ओंकार टापसे, कृष्णा प्रधान आदींनी दिला आहे.

पत्रकारीतेच्या निकालासंदर्भातील समस्या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आली. परीक्षा विभागातील वरिष्ठांशी बोलून हा विषय तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. – सागर वैद्य (व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

Story img Loader