मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये नोंद

नाशिक : जिल्ह्यात  ‘ब्रॉड हेड फॅन थ्रोटेड’ आणि ‘स्पाईनी हेडेड थ्रोटेड लिजार्ड’  या दोन दुर्मीळ सरडय़ांचे अस्तित्व दिसून आले आहे.  निफाड तालुक्यातील विंचूर या गावाजवळ नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा आणि लासलगाव येथील सर्पमित्र प्रमोद महानुभव यांनी ही माहिती दिली. पुण्यातील सर्प अभ्यासक वरद गिरी यांचे मार्गदर्शन यासाठी त्यांना झाले.

‘ब्रॉड हेड फॅन थ्रोटेड’ हा सरडा गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मुंबई, पुणे परिसरांत दिसल्याची नोंद आहे. या सरडय़ावर पहिला संशोधन प्रबंध २०१६ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. नाशिक जिल्ह्य़ात प्रथमच हा सरडा दिसल्याची नोंद झाली आहे. ‘स्पाईनी हेडेड थ्रोटेड लिजार्ड’ हा सरडा गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या सखल प्रदेशात आणि उंच स्थानामध्ये गवताळ प्रदेशात आणि खडकांवर, टेकडीवर आढळून येतो.  हे दुर्मीळ जातींचे सरडे आढळल्याने संशोधकांना अभ्यासाची संधी उपलब्ध झाली आहे.  या सरडय़ांवर अभ्यास होणे आवश्यक असून विंचूर परिसरात आणखी सरडय़ाच्या जाती दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याविषयी प्रमोद महानुभव यांनी माहिती दिली. १० वर्षांपासून आपण सर्प पकडत असल्याने पुण्यातील सर्प अभ्यासक वरद गिरी यांनी या परिसरात सरडे कसे शोधावेत, याविषयी मार्गदर्शन केले. तीन महिने सरडय़ांचा अभ्यास करत होतो. यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिकनेदेखील सहकार्य केले. त्यामुळेच आम्हाला  विंचूर परिसरात दोन नवीन जातींचे अस्तित्व दिसून आले, असे त्यांनी सांगितले.

दुर्मीळ सरडय़ाची नाशिकमधील ही पहिली नोंद असून जिल्ह्यातील कीटक, सरडे, बेडूक,आदींवर पाहिजे तसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे दुर्मीळ वन्यजीव असूनही त्याची नोंद होत नाही. आम्ही तीन महिने त्या परिसरात सरडय़ांचा अभ्यास करीत होतो. या परिसरातील जैवविविधता अभ्यास करण्यासाठी आम्ही वनविभागाची परवानगी घेऊन काम करणार आहोत.

– प्रा. आनंद बोरा, अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक

‘ब्रॉड हेड फॅन थ्रोटेड’  

समुद्रसपाटीपासून १६८३ ते ३०५१ फूट उंचीवर, गवत आणि खडकाळ प्रदेशात ‘ब्रॉड हेड फॅन थ्रोटेड’ सरडा आढळून येतो. या सरडय़ाच्या खालच्या जबडय़ावर निळ्या पट्टय़ासह किंचित दाबलेले, मध्यम आकाराचे, पांढऱ्या रंगाचे आच्छादन दिसते.  मे, जून आणि ऑगस्ट या कालावधीत नर दगडांवर पिवळा पंखा बाहेर काढून मादीला आकर्षित करण्याबरोबर दुसऱ्या नराला आपल्या क्षेत्रात न येण्यासाठीदेखील इशारा देतो.

‘स्पाईनी हेडेड थ्रोटेड लिजार्ड’ 

सरडाच्या ‘स्पाईनी हेडेड थ्रोटेड लिजार्ड’ या प्रजातीचे नाव  लॅटिन शब्द ‘स्पायने’, ज्याचा अर्थ ‘रीढ’ आणि ग्रीक शब्द ‘सेफ्लस‘, ज्याचा अर्थ ‘डोके’ आहे.  हे त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस वाढविलेले मणक्याचे आकर्षण दर्शवते. हा सरडा गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या सखल प्रदेशांत आणि उंच स्थानामध्ये गवताळ प्रदेशात आणि खडकांवर, टेकडीवर आढळून येतो. मे ते जूनच्या सुरुवातीस ते मादीस आकर्षित करतात.  आतापर्यंत भारतातील कोरडय़ा भागात पाच नवीन प्रजातींचे फॅन-थ्रोटेड सरडे सापडले आहेत.

 

 

Story img Loader