लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : राज्य शासनाकडून जळगाव शहरासाठी वार्षिक बाजारमूल्य दरात म्हणजेच रेडिरेकनरमध्ये तब्बल ५.८१ टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे जमिनींसह घरांच्या किंमती काही प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत असली, तरी रेडिरेकनर दरातील वाढीमुळे फक्त खरेदी-विक्री व्यवहारातील मुद्रांक शुल्क वाढेल. त्याचा थेट परिणाम जमिनी किंवा घरांच्या किंमतीवर होणार नसल्याचे या क्षेत्रातील जाणकार, अभ्यासकांनी म्हटले आहे.
राज्यात दरवर्षी एक एप्रिलला रेडिरेकनरचे दर नव्याने लागू होतात. नवीन दरानुसार त्या रकमेवर नागरिकांना मुद्रांक शुल्क देखील भरावे लागते. त्यानुसार, नोंदणी आणि मुद्रांक विभागाने तयार केलेले जमीन, सदनिकांचे दर इतर विभाग ग्राह्य धरतात. जळगाव शहरात तीन वर्षांपासून रेडिरेकनरच्या दरात कोणतीच वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे घरांच्या किंमती काही प्रमाणात स्थिरच होत्या. यंदा रेडिरेकनरमधील दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तसेच त्यात किती वाढ असेल, याबाबतही संबंधित घटकांमध्ये उत्सुकता होती.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीने शासनाचे कर उत्पन्न वाढविण्यासाठी रेडिरेकनरच्या दरात तब्बल १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडे पाठवला होता. प्रत्यक्षात ५.८१ टक्क्यांचीच वाढ लागू करण्यात आली. नियोजन समितीच्या प्रस्तावाला मान्यता देताना सरासरी कमी वाढ मान्य करण्यात आल्याचे एकूण आकडेवारीवरून दिसून येते. रेडिरेकनरची दरवाढ एक एप्रिलपासून लगेच लागू होत आहे. परिणामी, महापालिकेच्या हद्दीतील सदनिका आणि जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारावेळी शासनाकडे भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात आता तेवढी वाढ होणार आहे. जमिनींसह फ्लॅट किंवा घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारावेळी शासकीय दरानुसार मुद्रांक शूल्क भरले जाते. मात्र, शासकीय किंमतीच्या चार ते पाचपट किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची देवाणघेवाण खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अप्रत्यक्षरित्या झालेली असते. त्यामुळे रेडिरेकनरच्या दरात झालेली वाढ जमिनींसह घरांच्या किंमतीवर फार काही परिणाम करणार नाही, असे जाणकारांमधून बोलले जात आहे.
रेडिरेकनरच्या दरात वाढ झालेली असली, तरी शासकीय खरेदीची रक्कम मुळात खूपच कमी राहत असल्याने त्याचा फार फरक मालमत्तांच्या किंमतीवर होण्याची शक्यता नाही. मात्र, रेडिरेकनरचे दर वाढल्याने शासनाचा महसूल बऱ्यापैकी वाढणार आहे. -रावसाहेब पाटील (बांधकाम व्यावसायिक, जळगाव)