नीलेश पवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात एकिकडे कुपोषण, बालमृत्यू यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना दुसरीकडे याच आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या मुदतबाह्य झालेला मोठा औषधसाठा थेट उघड्यावर आढळून आला. एकिकडे जिल्ह्यात औषध साठ्यांचा तुटवडा असतांना जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला हा साठा मुदतबाह्य होईपर्यत याचा वापर का झाला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>>नाशिक: सिन्नर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अपघात – मायलेकाचा मृत्यू

राज्यात सर्वाधिक कुपोषण असलेला जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात औषध टंचाई निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयातही आवश्यक औषधांचा तुटवडा होत असल्याने याचा थेट परिणाम हा रुग्णांना सोसावा लागत आहे.त्यातच नंदुरबार तालुक्यातील पिंपळोदपासून करंजवे गावाकडे जातांना स्मशानभूमिलगत एका शेताच्या बाजूला मोठ्या प्रमाणात शासकीय वापारासाठीचा औषध साठा फेकून दिल्याचे उघड झाले. जागरुक नागरीक निंबा पाटील यांनी याबाबत आरोग्य प्रशासनास कळविल्यानंतर त्यांनी सर्व औषधांचा पंचनामा करुन ते उपकेंद्र पिंपळोद येथे जमा केले. हा औषधसाठा इतक्या मोठ्या प्रमाणात होता की तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना तो मोजमाप आणि नेण्यासाठी मोठ्या वाहनाचा वापर करावा लागला.

हेही वाचा >>>जळगाव जिल्हा दूध संघातून एकनाथ खडसेंना दे धक्का; शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

या औषध साठ्यात लहान मुले, महिला, गरोदर माता यांच्या रक्तवाढीची औषधे, गोळ्या, खरुज, पोटाचे आजार, एचआयव्ही तपासणी संच, रोगप्रतिकारक गोळ्या, उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, खोकला, ताप यावरील औषधांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. इतका मोठा शासकीय वापराचा साठा नेमका कोणी फेकला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हा औषधसाठा साधरणत: महिन्यापुर्वी मुदतबाह्य झाल्याचे दिसून येते . जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्युचे प्रमाण अधिक असतांनाच इतक्या मोठ्या प्रमाणातल्या औषध साठ्याचा वापर न होता ते मुदतबाह्य झाले तरी कसे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

हेही वाचा >>>नाशिक: आमिष दाखवून दोन जणांना १० लाख रुपयांना गंडा; दोन संशयितांना पोलीस कोठडी

मुळातच अशा पद्धतीने उघड्यावर मुदतबाह्य औषधे फेकणे हा गुन्हा असताना फक्त शासकीय वापरासाठी असलेली ही औषधे अतिशय गुप्तपणे सुनसान रस्त्यावर फेकण्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पंचनामा करुन जी औषधे आपल्या ताब्यात घेतली, त्यापेक्षा अधिकची औषधे याठिकाणी दोन दिवसांपासून फेकण्यात आली होती. मात्र त्यातील अनेक औषधे रात्रीतून गायब झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

हा सर्व प्रकार अतिशय गुप्तरित्या आरोग्य यंत्रणेने हाताळला. ही औषधे जमा करुन १० दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असला तरी याबाबत काहीही कारवाई होऊ शकलेली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने यावरील संच (बॅच) नंबरची पडताळणी करुन ही औषधे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची नसल्याचे सांगितले आहे. याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाला पत्र देवून त्यांची आहेत का, याबाबत पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून याबाबत खुलासा झालेला नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expired drug stock found in the open amy