नाशिक – रुग्णालया्ंना प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या वाहनातील (टेम्पो) एका सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे शनिवारी सायंकाळी गंगापूर रोडसह आसपासचा परिसर हादरला. हा स्फोट इतका जोरदार होता की, रस्त्यालगतच्या चार ते पाच इमारतींची तावदाने फुटली. वाहनाचे पूर्णत: नुकसान झाले. रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या चारचाकी व रिक्षाचेही नुकसान झाले. या दुर्घटनेत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले.
हेही वाचा >>> नाशिक : ललित पाटीलसह चौघांना पोलीस कोठडी
गंगापूर रस्त्यावरील शांतीनिकेतन चौक परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. खासगी रुग्णालयांना प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा करणारे वाहन या भागातून निघाले होते. गतिरोधकावरून जाताना त्यातील काही सिलिंडरचा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने गंगापूर रोड परिसरातील इमारती व घरांना हादरे बसले. ज्या चौकात हा स्फोट झाला, त्या परिसरातील शैलजा अपार्टमेंट, ऋषिराज हॉरिझॉन (एक व दोन) आणि अन्य इमारतींच्या काचा फुटल्या. प्रचंड आवाजाने नागरिक भयभीत झाले. स्फोटाने सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चक्काचूर झाला. सिलिंडर काही अंतरावर फेकले गेले होते. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. गंगापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांना दूर करुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. वाहनातील तीनपैकी एका सिलिंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान,वाहन गतिरोधकावर आदळून सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.