लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव: काही दिवसांपासून नविन शिधापत्रिका मिळवून देणे अथवा शिधापत्रिका दुरुस्त करण्यासंदर्भातील कामे करण्याच्या नावाने सर्वसामान्यांची लुबाडणूक करणाऱ्या दलालांचा मालेगावात सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींचा आलेख वाढत असल्याचे दिसून आल्यानंतर दलालांच्या भूलथापांना बळी न पडता शिधापत्रिकेसंबंधी कामे करण्यासाठी लोकांनी स्वत:च पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्याची वेळ आता धान्य वितरण अधिकाऱ्यांवर आली आहे.
यंत्रमाग शहर असलेल्या मालेगावात अशिक्षित कामगारांची संख्या मोठी आहे. नवीन पिवळी शिधापत्रिका तयार करणे, केशरी शिधापत्रिका पिवळी करणे, शुभ्र शिधापत्रिका केशरी करणे, धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन करणे, स्वस्त धान्य दुकान बदलणे, शिधापत्रिकेत नवीन नावे समाविष्ट करणे, मयत अथवा अन्य कारणांमुळे नावे कमी करणे, शिधापत्रिका विभक्त करणे अशी शिधापत्रिकेशी संबंधित कामे करण्यासंदर्भात कामगार वर्गाकडे पुरेशी माहिती नसते. त्यामुळे या कामासाठी अनेकदा नागरिक स्वत: पुरवठा विभागात येत नाहीत. त्याचाच गैरफायदा घेऊन अशा गरजू नागरिकांना गाठून दलाल ही कामे करुन देण्याचे प्रलोभने दाखवितात. त्यासाठी अव्वाच्या-सव्वा पैसे उकळतात.
हेही वाचा… आता गुन्हेगारांची कुंडली; आयुक्तांचे पोलीस ठाण्यांना आदेश
शहरातील कॅम्प, इस्लामपुरा, संगमेश्वर, नवापुरा अशा विविध भागात अशी कामे करुन देणाऱ्या दलालांचे प्रस्थ वाढले आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने नागरिकांनी दलालांच्या खोट्या प्रलोभनांना बळी न पडता स्वत: धान्य वितरण कार्यालयात येऊन आपली कामे करुन घ्यावीत, असे आवाहन शहर धान्य वितरण अधिकारी दीपक धिवरे यांनी केले आहे.
हेही वाचा… नियोजित वेळेआधीच ट्रेन गेली, प्रवाशांना झाला मनस्ताप, कुठे आणि कधी घडलं हे? वाचा…
शिधापत्रिकेशी संबंधित कामाबाबत नागरिकांची कुणी दिशाभूल अथवा फसवणूक करु नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, शिधापत्रिकेशी संबंधित कामात सुसुत्रता, गतिमानता व पारदर्शकता यावी तसेच लोकांची दलालांकडून लुबाडणूक होऊ नये, यासाठी एक ऑगस्टपासून या कामासाठी ऑफलाईनबरोबर ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे धिवरे यांनी सांगितले.