महाराष्ट्र दिन सोहळ्यात पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आलेले उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट गुन्ह्यात अडकवून मदत करण्यासाठी त्यांनी चार लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार नांदगावचे शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी केली. या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमिष; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा
महाराष्ट्र दिन सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईनकर यांना विशेष पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर काही तासात त्यांची उचलबांगडी झाली. उपनगर पोलीस ठाण्यातून त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. या घटनाक्रमानंतर आता हा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आमदार कांदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष पदावर असतांना एका महिलेच्या तक्रारीवरून १० नोव्हेंबर २०१६ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन निरीक्षक माईनकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
हेही वाचा >>> जळगाव : पाचोर्यानजीक टायर फुटल्याने टॅक्टर उलटून युवक जागीच ठार
माईनकर यांनी गुन्ह्यातील अन्य संशयितांवर दबाव टाकत व धमकावत आपणासही यात गोवण्याचा प्रयत्न केल्याचे कांदे यांनी म्हटले आहे. या तपासात मदत करण्याचे अमिष दाखवत माईनकर यांनी चार लाख रुपयांची लाच व खंडणी मागितली. लोकसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम व कोट्यवधींच्या मिळकती स्वत:सह नातेवाईकांच्या नावाने विकत घेतल्याचे कांदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात माईनकर यांच्या विरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.