कडाक्याची थंडी आता जिवावर बेतू लागली असून सप्तशृंग गडावर थंडीमुळे आजारी पडलेल्या भिकाऱ्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे मनमाड रेल्वे स्थानकात सकाळी रुळाला तडा गेला. हा प्रकार गँगमनच्या वेळीच लक्षात आल्याने संभाव्य अपघात टळला.

सप्तशंग गडावर भीक मागणारे पांडू जाधव हे थंडीमुळे आजारी पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. थंडी, धुक्यामुळे उत्तरेतून पुणे, मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून या मार्गावरील प्रवासी गाडय़ा पाच ते सहा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यात कडाक्याची थंडी रेल्वे रुळाला तडे जाण्याचे कारण ठरली आहे. मनमाड रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास हा प्रकार घडला. तडा गेलेल्या रेल्वे रुळाची जोडणी झाल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. काकीनाडा एक्स्प्रेसला मनमाड स्थानकात येण्यापूर्वीच थांबविण्यात आले. रुळाला तडा गेल्याची बाब गँगमन अमोल पगारे यांच्या लक्षात आली. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तडा गेलेल्या रुळाची दुरुस्ती करण्यात आली.

काही दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने पारा पाच अंशाच्या खाली गेला आहे. तापमान घसरल्याने रेल्वे रुळाला तडा गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात या फलाटावर येणाऱ्या सर्व गाडय़ा ऐनवेळी दुसऱ्या फलाटावरून मार्गस्थ करण्यात आल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे ५.१ या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी पारा काहीसा वर चढला असला तरी वातावरणात गारवा कायम आहे. सर्वाना हुडहुडी भरली आहे. थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटविल्या जात आहे. कडाक्याची थंडी कमी होत नसल्याने द्राक्ष मण्यांना तडे जाणे, द्राक्षवेली, द्राक्षघड यांचा विकास खुंटल्याने उत्पादक धास्तावले आहेत. थंडीमुळे उघडय़ावर, पदपथांवर राहणारे नागरिक अधिक प्रभावित झाले आहेत.

Story img Loader