लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : महापारेषणच्या एकलहरे येथील विद्युत उपकेंद्रातील एकापाठोपाठ एक तीन रोहित्रातील बिघाडामुळे महावितरणची उपकेंद्रे प्रभावित होऊन नाशिकरोड भागातील सुमारे एक लाख नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. रविवारी मध्यरात्री दीड वाजल्यापासून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित असून पर्यायी मार्गाने मिळणारी वीज कमी असल्याने दोन किंवा तीन दिवस संबंधितांना भारनियमनास तोंड द्यावे लागणार आहे.

वीज व्यवस्थेतील बिघाडाचा त्रास सामनगाव, दसक, राज राजेश्वरी मंगल कार्यालय, जेलरोड, नाशिकरोड, देवळीगाव, भगूर, शिंदे, पळसे, चेहडी, उपनगर आणि लगतच्या परिसरातील ४० हजारांहून अधिक ग्राहकांना सहन करावा लागला. रविवारी रात्री शहरात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यावेळी अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. एक, दोन तासांनी तो पूर्ववत होत असताना नाशिकरोड भागास मोठ्या तांत्रिक बिघाडाची झळ बसली. हजारो नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. वातावरणात कमालीचा उकाडा असल्याने अनेकांना रात्र जागूनच काढावी लागली. वीज नसल्याने सोमवारी सकाळी इमारतींमध्ये वरच्या टाकीत पाणी नेणे अवघड झाले. घरातील दैनंदिन कामेही ठप्प झाली.

आणखी वाचा-मानधन वाढीसाठी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा नाशिक-मुंबई मोर्चा

प्रभावित झालेल्या क्षेत्राला ७० मेगावॉट वीज लागते. सध्या पर्यायी मार्गाने ४० मेगावॉट विजेची व्यवस्था केली जात असून अद्याप ३० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे उपरोक्त भागात सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे. वीज पुरवठ्याची स्थिती पूर्ववत होईपर्यंत ते करावे लागणार असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात.

वीज पुरवठा पूर्ववत होण्यास ४८ ते ७२ तास लागण्याची शक्यता

एकलहरे येथील महापारेषणच्या या विद्युत उपकेंद्रातून महावितरणच्या पंचक, मुक्तिधाम, देवळाली, भगूर, एकलहरे व सामनगाव या उपकेंद्राना वीज पुरवठा केला जातो. यातील एकापाठोपाठ एक अशा तीन रोहित्रात बिघाड झाल्याची अनपेक्षित घटना घडल्याचे महावितरणने म्हटले आहे. त्यामुळे एकलहरेच्या अति उच्चदाब उपकेंद्रातून मिळणारा वीज पुरवठा पर्यायी इतर उपकेंद्रातून घेऊन पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जवळपास २० मेगावॉट क्षमतेचे भार व्यवस्थापन करून गरजेनुसार चक्राकार पद्धतीने भारनियमन करून उपकेंद्रातील वाहिन्यांना टप्याटप्याने वीज पुरवठा करणार आहे. दुरुस्ती कामाची व्याप्ती जास्त असल्याने ४८ ते ७२ तासाचा अवधी लागू शकतो. वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास तत्काळ वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल. या काळात बाधित भागातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Failure of three rohitra in eklahare sub centre nashik road area in darkness mrj
Show comments